बाबा काल्यावर चाकू हल्ला ; तिघा आरोपींना अटक

0

बाजारपेठ पोलिसांची कारवाई ; अप्रिय घटनांमुळे नागरीकांची सुरक्षितता धोक्यात

भुसावळ- शहरातील खडका रोडवरील नवीन इदगाह जवळ शनिवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास पोलिसांच्या यादीवरील गुन्हेगार आशिक बेग असलम बेग उर्फ बाबा काल्या याच्यावर तीन जणांनी जुन्या वादाच्या कारणावरून चाकू हल्ला केल्याने बाबा काल्या गंभीररीत्या जखमी झाला होता तर जखमीने दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांविरूध्द जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यातील तीनही संशयीतांच्या मुसक्या बाजारपेठ पोलिसांनी अयान कॉलनीतून आवळल्या आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

गोपनीय माहितीवरून केली अटक
शनिवारी रात्री बाबा काल्यावर हल्ला करून संशयीत आरोपी मोहम्मद उर्फ शोलू इस्माईल मोहम्मद आलम, शाकिर उर्फ गोलू सैयद रशीद, शेख दानिश शेख रझिउल्ला हे पसार झाले होते. संशयीत अयान कॉलनीत आल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजेश शिंदे, नाईक विजय पाटील, कॉन्स्टेबल विकास सातदिवे आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

जुन्या वादातून केला हल्ला
बाबा काल्या याच्यावर शनिवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास इस्माईल उर्फ शोलू, दानिश उर्फ पुद्या व शाकीर उर्फ गोलू या तीन जणांनी जुन्या वादातून चाकू हल्ला करीत पोटावर वार केले होते. या हल्ल्यात बाबा काल्या जखमी झाल्याने त्यास तत्काळ उपचारार्थ हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले.