बाबा गुरुमीतचा हिंसाचार हा देशद्रोहच!

0

दोन तरुण साध्वींचे लैंगिक शोषण करणारा, त्यांच्यावर धर्माचा बुरखा पांघरून अनन्वित अत्याचार करणारा सिरसा येथील डेरा सच्चा सौदा या आश्रमाचा प्रमुख गुरुमीत रामरहीम सिंग याला विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर त्याच्या समर्थकांनी न्याय व्यवस्थेला खुले आव्हान दिले आहे. हरियाणासह पाच राज्यांत जो उत्पात या मंडळींनी माजविला, हा उत्पात म्हणजे निव्वळ न्यायसंस्थेसमोरील खुले आव्हानच नाही तर ते या देशातील लोकशाही व्यवस्थेसाठीचे अत्यंत धोकादायक पाऊल आहे. गुरुमीत सिंग याला अशी मस्ती का यावी? त्याने व त्याच्या समर्थकांनी इतका नंगानाच घातला असता, तेथील राज्य सरकार या मंडळींना हिंसाचारासाठी खुली सूट का देत आहेत? कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसविली जात असताना, निव्वळ राजकीय फायद्यासाठी हा धिंगाणा सहन केला जात आहे का? या प्रश्‍नांची उत्तरे मिळायला हवीत. डेराप्रमुखाला शिक्षा ठोठावली गेली तर राज्यात उत्पात माजविला जाईल, याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयास दिली होती. त्यामुळे न्यायमूर्तींनी तसे झाले तर शस्त्र हाती घ्या, असे आदेश दिले होते. त्यावरहुकूम पोलिस, निमलष्करी जवान अन् गरज पडल्यास लष्करालादेखील परिस्थिती हाताळण्यासाठी बोलविण्याची तयारी राज्य सरकारने केली होती. इतकी सर्व तयारी करूनही डेरासमर्थकांचे उद्रेक होतच आहेत, ते जाळपोळ आणि पोलिस व लष्करी जवानांवर हल्ले करतच आहेत, प्रसारमाध्यमेही त्यांनी सोडली नाहीत. काही दिवसांपूर्वीच डेराप्रमुखांना अटक झाली तर क्षणात देश देशोधडीला लागेल, अशी मुर्दूमकी एका भक्ताने बोलून दाखवली होती. म्हणजेच, काय ही मंडळी देशाला, येथील व्यवस्थेला आव्हान देत आहेत. एकप्रकारे हा देशद्रोह आहे. या उर्मटांवर देशद्रोहाचेच गुन्हे दाखल व्हावेत, त्यांना आजन्म कारागृहात सडविले गेले पाहिजेत. देव, धर्माचा बुरखा घालून ही मंडळी स्त्रियांचे शोषण करतात, स्वतःला अवतारी पुरुष घोषित केले ही त्यांच्या भक्तीत निव्वळ आंधळी झालेली मंडळी अशाप्रकारे हिंसाचारास उद्युक्त होतात. आपला बाबा बलात्कार करूच शकत नाही, अशी वल्गनाही ही मंडळी करतात. हा सगळा तमाशा देशाने विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून पाहिला आहे. बरे, बलात्कार किंवा मुलींच्या लैंगिक शोषणात कारागृहात धाडला जाणारा गुरुमीत सिंग हा काही एकमेव बाबा नाही. यापूर्वीही 2013 मध्ये आसाराम बापू याला एका अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी कारागृहात धाडण्यात आले आहे. आजही तो कारागृहात सडत पडला आहे. त्यावेळीदेखील त्याला अटक करण्यासाठी पोलिस गेले असता, इंदूरच्या आश्रमाबाहेर त्याच्या भक्तांनी असाच धिंगाणा घातला होता. त्याच्या अटकेवेळीही असेच निरपराधांचे बळी गेले होते. त्यानेही पोलिसांना पर्यायाने शासन व्यवस्थेला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला होता. त्याला अटक करण्यासाठी लष्कर बोलवावे लागले नसले तरी, अटक टाळण्यासाठी त्याने ज्या माकडउड्या मारल्या त्या पाहाता, या बाबांची नस वेळीच ठेचण्याची गरज निर्माण झाली आहे, हे अधोरेखित होते.

आसारामबापूनंतर आता गुरुमीत सिंग याचे प्रकरण चव्हाट्यावर आले. गुरुमीत हा प्रभावशाली धार्मिक नेता आहे. हरियाणा, पंजाब, उत्तरप्रदेश, दिल्ली, राजस्थान या पाच राज्यांत त्याचे लाखो अनुयायी आहेत. या अनुयायांवर त्याने आपण कसे अवतारी पुरुष आहोत, हे फार नमुनेदारपणे बिंबवलेले आहे. धर्म आणि अवतारी पुरुषत्व हे अफूच्या गोळीसारखे काम करत असतात. एकवेळ ही गोळी भक्तांना दिली की ते आपोआप आंधळे होऊन जातात. बुवा, बाबासाठी वेळप्रसंगी ते जीवावरही उदार होतात. सद्या हरियाणा, पंजाबातील हिंसाचार पाहाता, ही बाब प्राकर्षाने सामोरे येते आहे. बाबा किंवा बुवा असेल तेथे स्त्रिया येतातच, अन् त्या या बाबांच्या लैंगिक शोषणाला बळीही पडत असतात. मुळात आपण शरीर नसून आत्मा आहोत, शरीर हे घाणीचे माहेरघर आहे. मृत्यूनंतर या शरीराचा त्याग करावा लागतो. आत्मा हा अमर आहे. त्यामुळे हे शरीर बाबांना सुपूर्त केले की आत्मानुभूती प्राप्त होते. ईश्‍वराला प्राप्त करायचे असेल तर स्त्रीने हे शरीर एकवेळ बाबाला सुपूर्त केले पाहिजे. म्हणजे ते पवित्र होते, व ईश्‍वर त्या स्त्रीवर प्रसन्न होतो, अशाप्रकारचे तर्क ही बाबामंडळी स्त्रियांना देत असतात. त्यांच्या या बडबडीला अनेक स्त्रिया बळी पडतात. त्यांचे अशाप्रकारे वारंवार लैंगिक शोषण होते.

एका दूरचित्रवाणी वाहिनीवर परिसंवाद ऐकण्यात आला होता. त्यात एक विचारवंत सांगत होता, बुवाबाबांचे आश्रम, मठ बंद केले पाहिजेत. कारण, ते स्त्रियांच्या शोषणाचे अड्डे झालेले आहेत. त्यावर त्या परिसंवादात सहभागी एका विदुषीने सांगितले होते, की असे करणे चुकीचे ठरेल. आश्रम, मठ बंद करायचे असेल तर अगोदर वेश्यालये बंद करावेत. वेश्यांच्या कोठ्या बंद कराव्यात. शरीराची भूक भागविण्यासाठी पुरुषांसाठी वेश्यालये ही व्यवस्था आहे. स्त्रियांनी तसल्या कामासाठी कुठे जावे? त्या देव अन् धर्माच्या नावाखाली या आश्रमात जातात. तेथे त्यांच्या शरीराची भूक भागविली जाते. त्यामुळे हे आश्रम आणि मठ वैगरे भानगडी सुरु राहिले पाहिजेत. अनेक स्त्रियांचे पती नपुंसक असतात. तरीही त्यांना कुण्या बुवा-बाबाच्या आशीर्वादाने पुत्रप्राप्ती होते. त्याबाबत तिच्या पतीसह कुटुंबातील कुणालाही काहीच वावगे वाटत नाही. उलटपक्षी आपले अपत्य हे कसे बाबाचा प्रसाद आहे, हे ती मंडळी चोहीकडे सांगत असतात. हे बुवा-बाबा नसते तर या स्त्रियांनी कुणाकडे पाहिले असते? त्यांना अपत्यप्राप्ती कशी झाली असती? याच सामाजिक परिस्थितीचा गैरफायदा गुरुमीत सिंगसारखे बुवा-बाबा घेत आहेत. या गुरुमीतने नेमके किती स्त्रियांचे लैंगिक शोषण केले माहित नाही. परंतु, दोन साध्वींनी तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना गोपनीय पत्र लिहिले नसते तर ही भानगड उघडकीस आली नसती. या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश तत्कालिन सरकारने सीबीआयला दिले नसते तर कदाचित हे प्रकरण दडपलेही गेले असते. या साध्वी तरुणींना अनेक धमक्या देण्यात आल्यात. हे प्रकरण उचलून धरणार्‍या एका संपादकाचा खून झाला. इतरही अनेक खून पचविले गेलेत. एवढे करूनही गेले 15 वर्षे हे प्रकरण न्यायदरबारी रखडलेले होते. कायदा आपले काहीच बिघडवू शकत नाही, अशा मस्तीत हा गुरुमीत सिंग राहात होता. त्याचे चित्रपट येत होते, त्यात तो अचाट कामगिरी करत असल्याचे दाखवून त्याच्या अवतारी पुरुषात्वावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पुरता खटाटोप सुरु होता. विशेष सीबीआय न्यायाधीशांनी न्यायाची बूज राखत त्याला शिक्षा ठोठावली नसती तर दोन साध्वींच्या बलात्काराचे हे प्रकरणही थंडबस्त्यात गेले असते, ते दबले गेले असते. परंतु, पापाचा घडा भरला असावा म्हणून हा गुरुमीत सिंग आता कारागृहात जाणार आहे.

न्यायालयाने गुरुमीतला दोषी ठरविल्यानंतर पाच राज्यांतील उफळलेला हिंसाचार पाहाता, हे सगळे पूर्वनियोजित असावे, असा संशय येऊ लागला आहे. हा हिंसाचार रोखण्यापासून सरकारचे हात कुणी बांधले? कोट्यवधींच्या सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले. 42 जणांचे बळी गेले आहेत. नोव्हेंबरमध्ये गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभांच्या निवडणुका आहेत. गुरुमीतला अटकेचा प्रभाव या निवडणुकांवर पडणार आहे. त्यामुळे हरियाणात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारने गुरुमीतच्या भक्तांना न डिवचण्याचा पवित्रा घेतला असावा, असे प्रथमदर्शनी दिसते. कारण, हरियाणा-पंजाब उच्च न्यायालयाने खट्टर सरकारला या हिंसाचारावरून जोरदार फटकारले असून, राजकीय फायदा पाहूनच हे सरकार शहर जळू देत आहे, हिंसाचार रोखत नाही, अशी फटकार उच्च न्यायालयाने लगावलेली आहे. भाजपचे खासदार साक्षी महाराज यांचेसारखे बोलघेवडे नेते तर अगदी उघडपणे गुरुमीतची पाठराखण करत आहेत. तसे करून ते एकप्रकारे आंधळ्या भक्तांना हिंसाचारासाठी प्रोत्साहित करत आहेत. गुरुमीतची पाठराखण करताना भाजपच्या नेत्यांना जनाची नाही तर किमान मनाची का होईना लाज वाटायला हवी.

अलिकडे सोशल मीडियावर एक फार छान पोस्ट वाचण्यात आली होती. कोपर्डी बलात्कारप्रकरणातील नराधमांना फाशी द्यावी, या मागणीसाठी लक्षावधी मराठ्यांनी विराट मोर्चे काढले. त्यांनी हातात दगड घेतले नाहीत. हरियाणात तर बलात्कार्‍याला शिक्षा देऊ नये म्हणून हातात दगड घेऊन त्याचे अनुयायी सरकारी यंत्रणांचे डोके फोडत आहेत. हिंसाचार माजवत आहेत. त्यांनी लोकशाही व्यवस्थेलाच आव्हान उभे केले आहे. संस्कार काय असतात ते मराठ्यांकडून शिकावे तर मस्तवालपणा काय असतो ते बाबा गुरुमीतच्या अनुयायांकडे पाहून दिसतो, असा संदेश या पोस्टमधून देण्यात आला होता. ही बाब सत्य आहे की, महाराज किंवा बाबा लोकांना आपण देशापेक्षा मोठे, कायद्यापेक्षा मोठे असल्याचे वाटू लागले आहे. तो त्यांचा भ्रम आहे. कायद्याचा दांडुका त्यांच्या पार्श्‍वभागावर ठेवून देऊनच हा भ्रम दूर करावा लागेल. या लोकांच्या डोक्यात मस्ती गेली आहे. ही मस्ती कठोर कायदेशीर कारवाईनेच उतरावी लागेल.

बाबा गुरुमीत रामरहीम सिंग याला बेड्या ठोकल्याच आहेत, तर त्याला कठोरात कठोर शिक्षाही न्यायालयाने द्यावी. जे त्याचे अनुयायी हिंसाचार करत आहेत, त्यांना कोणतीही दयामया न दाखविता सरळ गोळ्या घालाव्यात. त्यांचा उद्रेक हा लोकशाही उलथावून लावण्यासाठी आहे. येथील घटनादत्त व्यवस्था नेस्तनाभूत करण्यासाठी हा उद्रेक आहे. ही माणसे देश अन् राज्यघटनेपेक्षा स्वतःला मोठे समजू लागले आहेत. ती माणसे पिसाळली असून, पिसाळले कुत्रे ज्याप्रमाणे मारून टाकले जाते, त्याप्रमाणे कुणाचाही मुलाहिजा न ठेवता या मंडळींना गोळ्या घाला. अशी कठोर कारवाई केल्याशिवाय असले बुवा आणि बाबा वठणीवर येणार नाहीत. त्यांच्या भक्तांनाही वठणीवर आणता येणार नाहीत. न्यायसंस्थेने कायदा हातात घेणार्‍यांवर शस्त्र चालविण्याची सूट दिलीच आहे; ती अत्यंत विचारपूर्वक दिली आहे. हरियाणासह पाच राज्यांत उद्रेक सुरु असून, तेथे लष्कर तैनात करण्यात आलेले आहे. या लष्कराने गुरुमीत सिंगच्या अनुयायांचे राष्ट्रद्रोही बंड बंदुकीच्या जोरावरच मोडून काढावे. तसे झाले तरच या देशातील लोकशाही व्यवस्थेची बूज राखली जाईल. अन्यथा, वाढता हिंसाचार या लोकशाहीच्या इभ्रतीचे धिंडवडे काढेल!

–  पुरुषोत्तम सांगळे

निवासी संपादक, दैनिक जनशक्ति, पुणे