हरियाणा, पंजाब, उत्तरप्रदेशसह पाच राज्यांत दंगली, जाळपोळ
पंचकुला (हरियाणा) : दोन साध्वींवर बलात्कार व लैंगिक शोषणप्रकरणी डेरा सच्चा सौदाप्रमुख गुरुमीत रामरहीम सिंग (वय 50) यांना पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणात 15 वर्षानंतर न्यायालयाने निकाल दिला असून, सोमवारी (दि.28) गुरुमीत रामरहीम यांना शिक्षा ठोठावली जाणार आहे. या निकालानंतर डेरासमर्थकांनी पंचकुलासह पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि दिल्ली या पाच राज्यांत हिंसाचार माजविला होता. दगडफेक, जाळपोळ करणार्या संतप्त जमावावर पोलिस व लष्कराने प्रारंभी अश्रुधुराचे नळकांडे डागले. तरीही जमाव आटोक्यात येत नाही असे पाहून सरळ गोळीबार केला. पंचकुला जिल्हा रुग्णालयात दाखल 17 जणांचे गोळी लागून मृत्यू झाले असून, डेराप्रमुखांचा आश्रम असलेल्या सिरसा येथे दोघांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. या दोन घटनांसह पंजाब व हरियाणातील दंगलीत एकूण 40 जण ठार झाले असून, 300 जण गंभीर जखमी झालेत. मृत्युमुखींचा आकडा वाढू शकतो. 100 पेक्षा जास्त वाहने पेटवून देण्यात आली असून, मीडियाच्या ओबी व्हॅनसह रेल्वे स्थानकांनाही आगी लावण्यात आल्या होत्या. रोहतकजवळील सुनारिया येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रास तात्पुरते कारागृह बनवून तेथे डेराप्रमुखांना ठेवण्यात आले होते. दरम्यान, या हिंसाचाराची पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून, डेराप्रमुखांच्या संपत्तीचा तपशील मागविला आहे. झालेले नुकसान डेराप्रमुखांकडून वसूल केले जाईल, असे उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. सकाळीच न्यायालयाने कायदा व सुव्यवस्था बिघडविणार्या डेरासमर्थकांविरुद्ध शस्त्र चालवा, असे आदेश सुरक्षा यंत्रणांना दिले होते. त्यानंतर पंजाब व हरियाणा राज्यांनी लष्कराला पाचारण केले होते. या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शांततेचे आवाहन केले आहे.
जाळपोळ, दगडफेक अन् सुरक्षा यंत्रणांकडून चोख प्रत्युत्तर
पंधरा वर्षांपूर्वी दोन साध्वींवर वारंवार बलात्कार करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बाबा गुरुमीत रामरहीम यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणासह अन्य एका बलात्कारप्रकरणाची सुनावणीही लवकर पूर्ण होणार आहे. शिक्षा होण्याची शक्यता पाहाता, डेराप्रमुखांच्या समर्थकांनी पंचकुलासह हरियाणा व पंजाबमध्ये प्रचंड तणाव निर्माण केला होता. पोलिसांनी डेराप्रमुखांना अटक केल्यानंतर हे समर्थक हिंसक झाले. त्यांनी जाळपोळ व दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिस व लष्कराला त्यांना पांगविण्यासाठी हिंसक कारवाई हाती घ्यावी लागली. अशा हिंसाचाराची संभाव्यता लक्षात घेता, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला होता. या आढाव्यानंतर कुणीही शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर सरळ शस्त्र चालवा असे आदेश न्यायालयाने सुरक्षा यंत्रणेला दिले होते. तसेच, कुणीही राजकीय नेता पंचकुला येथे येणार नाही, कोणीही भडकाऊ भाषण द्यायचे नाही, असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे गुरुवारपासून लष्कर व पोलिस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. कालच बाबा गुरुमीत रामरहीम हे आपल्या 400 गाड्यांच्या ताफ्यात पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर राहण्यासाठी रवाना झाले होते. परंतु, न्यायालयात जाण्यासाठी पोलिसांनी केवळ दोन गाड्यांना परवानगी दिली होती. कैथल येथे त्यांच्या ताफ्यातील समर्थकांना रोखून धरण्यात आले होते. राज्यातील संवेदनशील भागात हेलिकॉप्टर व ड्रोनद्वारे निगरानी ठेवली जात होती. काही ठिकाणी समर्थकांनी रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी तो हाणून पाडला. पंचकुला येथे सुमारे अडिच लाख डेरासमर्थक आले आहेत, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
दिल्लीसह पाच राज्यांत संचारबंदी, हायअॅलर्ट जारी
15 वर्षांपूर्वी डेरा सच्चाप्रमुखांच्या सिरसा येथील आश्रमात ही लैंगिक शोषण व बलात्काराची घटना घडली होती. त्यावेळी युवती असलेल्या या दोन साध्वींनी तशी तक्रार पोलिसांत दाखल केली होती. रात्रभर टीव्हीवर अश्लील चित्रफित पाहून बाबा गुरुमीत रामरहीम अत्यंत निदर्यीपणे त्यांच्यावर वारंवार बलात्कार होते, असे या तक्रारीत नमूद होते. प्रकरण न्यायालयात दाखल झाल्यानंतर तब्बल 200 वेळा त्यावर सुनावणी झाली होती व अनेकवेळा गुरुमीत रामरहीमने त्यावर स्थगिती घेतली होती, असे सीबीआच्या वकिलांनी सांगितले. न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी सिरसा येथेही लष्कर तैनात करण्यात आले होते. डेरा सच्चाबाहेर पोलिसांनी पथसंचलनही केले. संपूर्ण पंजाब व हरियाणात 15 हजार निमलष्करी जवानांसह हजारोच्या संख्येने लष्कर तैनात करण्यात आले होते. गुरुमीत रामरहीम दोषी सिद्ध होताच पंचकुलामध्ये संतप्त समर्थकांनी प्रसारमाध्यमांच्या ओबी व्हॅनवर हल्ला चढविला. तसेच, सुरक्षा यंत्रणांनाही लक्ष्य केले. त्यात अनेक पत्रकार व पोलिस जखमी झाले होते. सुरक्षा यंत्रणांनीही लाठीमार, अश्रुधुराचे नळकांडे डागून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. तसेच, काही ठिकाणी जमावावर गोळीबारही करावा लागला. त्यात 40 ठार तर शेकडो जण गंभीर जखमी झाले आहेत. तब्बल 20 हजार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हिंसाचार पसरण्याची शक्यता पाहाता, पंजाब व हरियाणा, दिल्लीसह पाच राज्यांत हायअॅलर्ट जारी करण्यात आला होता. पंजाब व हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी डेरासमर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
उच्च न्यायालय नुकसान भरपाई वसूल करणार!
डेरासमर्थकांडून होत असलेल्या नुकसानीची भरपाई डेरा सच्चा सौदाच्या संपत्तीतून केली जाईल, असे आदेश पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने देत, डेराप्रमुखांच्या संपत्तीचा तपशील मागविला होता. न्यायमूर्ती एस. एस. सारो, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती अवनीश झिंगन यांनी या हिंसाचाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी डेरासमर्थकांना शांततेते आवाहन केले आहे. हरियाणाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक मोहम्मद अकील यांनी हिंसाचार माजविणार्या 1200 डेरासमर्थकांना अटक केल्याची माहिती दिली. तसेच, राज्यात जमावबंदी लागू केल्याचेही सांगितले.
परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. तसा प्रयत्न कुणी केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई होईल. असंवेदनशीलता निर्माण करण्याचे प्रयत्न खपून घेतले जाणार नाहीत.
– अमिताभसिंग धिल्लन, पोलिस महासंचालक