बाबा बोहरी खून प्रकरणातील मुख्य आरोपीस पोलीस कोठडी

0

अमळनेर-शहरातील सराईत गुन्हेगार व अट्टल घरफोड्या बाबा बोहरी यांचा खुनी कैलास नवघरे यास न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी न्यायाधीश वाय.जे.वळवी यांनी ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बाबा बोहरी खून प्रकरणी पोलिसांना चकवा देत फरार असलेला मुख्य कुख्यात आरोपी नवघरे यास जळगाव गुन्हा अन्वेषण शाखेने घाटकोपर मुंबई येथून गुरुवारी ताब्यात घेतले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशीरा अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यावेळी नवघरे यास शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग आणि त्याचे साथीदार यांची चौकशी करण्याकामी व गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू ताब्यात घेण्यासाठी त्याला पोलिस कोठडीची मागणी केली असता २ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. बाबा बोहरी खुनासह व शहरात झालेल्या घरफोड्या करून त्या त्या वेळेस मदत करणाऱ्या व त्याला आश्रयस्थान देणाऱ्या २५ ते ३० छोट्या-बड्या संशयितांची नावे त्याने उघड केल्याचे मिळालेला सूत्रांकडून खात्रीलायक वृत्त असून या सर्वांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.