बाबा बोहरी खून प्रकरणातील आरोपी अट्टल चोर ; 11 घरफोड्यांची कबुली

0

खुनातील शस्त्र जप्त ; घरफोडीत पत्रकाराचाही समावेश ; चौघांना अटक

अमळनेर (प्रतिनिधी)- अमळनेर शहरातील पेट्रोल पंप मालक बाबा बोहरी उर्फ अली असगर बोहरी यांचा खून शहरातील चार आरोपींनी कट कारस्थान रचून केल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाल्याचे अमळनेर पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शुक्रवारी पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याच्या उकल संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. बडगुजर यांनी सांगितले की, गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी खुन करण्यासाठी वापरलेले हत्यार व वापरलेली वाहने जप्त केली आहेत. यासह मुख्य आरोपी कैलास नवघरे व त्याची साथीदार तौफिक शेख मुशोरोद्दीन, तन्वीर शेख मुक्तार, मुस्तफा शेख महमंद यांनी शहरात 11 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान या चार ही आरोपींसोबत घरफोडीत शहरातील स्थानिक पत्रकार गौतम बिर्‍हाडे हादेखील सहभागी असल्याचा गुन्ह्यात पुरावा मिळाल्याने पोलिसांनी त्यास अटक करून त्याची होंडा कंपनीची शाइन मोटार सायकल (एम.एच.19 बी.एस. 6212 ) ही ताब्यात घेतली आहे. ही मोटार सायकल घरफोडी करताना सखोल चौकशीत आरोपीनी वापरले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

जळगावसह धुळे व अमळनेरात विकले घरफोडीतील सोने
यावेळी जळगांव पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उपधीक्षक रफीक शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांचे पोलिस पथक किशोर पाटील, प्रमोद बागडे, विजय साळुंखे, रविंद्र पाटील, योगेश महाजन,प्रदीप पवार, मिलिंद बोरसे, प्रविण पारधी या पथकांनी कौशल्यपूर्वक कामगिरी करीत या पोलिस तपासात आरोपींनी केलेल्या घरफोड्यात जवळपास 50.5 तोळे सोने व सुमारे 20 किलोग्राम चांदी चोरल्याची कबुली त्यानी दिली आहे. या चोरीत वेळोवेळी माल घेऊन विल्हेवाट लावणारा कैलास नवघरे याचा साथीदार दीपक रावा मराठे ( पाटील) यांचा समावेश असल्याने त्याला अटक करून, चोरीस गेलेला मुद्देमाल गोळा करण्याचे काम पोलीस युद्ध पातळीवर करत आहेत. दीपक मराठे याने जळगाव, धुळे आणि अमळनेर आदी भागात सराफांच्या दुकानावर सदर माल विकला असल्याचे बडगुजर यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.