बाबा बोहरी खून प्रकरण ; आरोपींनी दाखवले घटनास्थळ

0

घटनाक्रम उलगडला ; सोमवारी दुपारी आरोपींना न्यायालयात हजर करणार

अमळनेर- शहरातील बाबा बोहरी उर्फ अली अजगर बोहरी (54, न्यू प्लॉट, अमळनेर) यांच्या खुनाचा उलगडा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने केल्यानंतर अटकेतील तिघा आरोपींना अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सोमवारी अटकेतील संशयीत आरोपी मुस्तफा शेख मोहम्मद (24, जुन्या सरकारी दवाखान्यामागे, गांधल पुरा, अमळनेर), तनवीर शेख मुख्तार शेख (23, ख्वाजानगर, अमळनेर),तौफिक शेख मुनीर (23, गांधली पुरा, दुर्गा अळी मोहल्ला, अमळनेर) यांना अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी नेत घटनाक्रम जाणून घेतला. या खुनातील मुख्य संशयीत आरोपी कैलास रामकृष्ण नवघरे (गांधली पुरा, अमळनेर) पसार असून त्याचा कसून शोध सुरू आहे.

पोलिसांनी जाणून घेतला घटनाक्रम
अटकेतील तिघा आरोपींना पोलीस बंदोबस्तात बोहरी पेट्रोल पंपानजीकच्या घटनास्थळी आणण्यात आले. आरोपींची ओळख पटू नये यासाठी आरोपींच्या चेहर्‍यावर काळा कपडा टाकण्यात आला. आरोपींनी घटनेच्या दिवशी कुठे मद्य प्राशन कुठे, मिरची पूड कुठे फेकले, गोळीबारासाठी कुठला स्पॉट निवडला यासह अन्य बाबींची बारकाईने माहिती घेण्यात आली. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, कॉन्स्टेबल सुनील हटकर, सुनील पाटील, प्रभाकर पाटील प्रसंगी उपस्थित होते. गुरुवार, 3 मे रात्री 11 वाजून 47 मिनिटांनी पंपावरून हिशोब करून घराकडे निघालेल्या बाबा बोहरी यांच्यावर उद्यानाजवळ दबा धरून बसलेल्या चौघांनी गोळीबार केल्याने बोहरी यांचा मृत्यू झाला होता.