बाबूजींचे व्याख्यानातून उलगडले जीवनसंगीत

0

पुणे : बाबूजींचे लहानपण, त्यांना असलेली संगीताची आवड, कोवळ्या वयात जगण्यासाठी करावी लागलेली यातायात… त्यातून सापडलेला जीवनाचा आणि संगीताचा सूर, गदिमा आणि त्यांचे मैत्र, बाबूजी आणि ललिताबाई यांचा परिषदेच्या सभागृहात झालेला विवाह, त्या विवाहात मंगलाष्टिका म्हणण्यासाठी महंमद रफी यांनी लावलेली हजेरी, बाबूजींची करडी शिस्त आणि त्यांनी संगीतात निर्माण केलेले सुवर्ण युग अशा अनेक आठवणी जागवत बाबूजींचे जीवनसंगीत उलगडले. बाबूंजींनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेल्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका ऐकत आणि त्यामागचा इतिहास जाणून घेत हे अनोखे व्याख्यान पार पडले.

निमित्त होते; महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या का. र. मित्र व्याख्यानमालेचे! चित्रपट आणि संगीताच्या ज्येष्ठ अभ्यासक सुलभा तेरणीकर यांनी ‘बाबूजींचे जीवनसंगीत’ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, सुनिताराजे पवार, दीपक करंदीकर उपस्थित होते.

तेरणीकर म्हणाल्या, ’बाबूजी शब्दांच्या उच्चारणाबाबत खूप आग्रही होते. ‘श’ आणि ‘ष’ च्या उच्चारणासाठी त्यांनी अनेक गायकांना रियाज करायला लावला. अस्सल मराठमोळ्या प्रतिभेचे दर्शन त्यांनी आपल्या गीतातून आणि संगीतातून घडविले. अजरामर गाणी आणि संगीत दिले. त्यांची वैचारिक बैठक पक्की होती. त्यांनी तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही.

जोशी म्हणाले, गदिमा आणि बाबूजी यांची निर्मितीची क्षेत्रे वेगळी असली तरी त्यांच्यात सर्जनाचे अद्वैत होते. त्यामुळे गदिमांच्या मनातल्या शब्दांना बाबुजींकडे चाल तयार असायची आणि बाबूजींच्या मनातील चालीवर गदिमांचे शब्द विराजमान व्हायचे.