बाभळाची सर्रासपणे कत्तल

0

भुसावळ। शहरालगत तापी खोर्‍यातील जुगादेवी जंगलात बाभूळवनाची कत्तल होत आहे. जुगादेवीसह अंजाळे घाट, तापीखोरे भागात हा प्रकार सर्रासपणे सुरू असतानाही महसूल आणि वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. वृक्षतोडीमुळे पशू-पक्ष्यांचा अधिवास नष्ट होत आहे.

शहरातील उत्तरेकडील तापी नदीच्या खोर्‍यात जुगादेवी जंगलात मोठ्या प्रमाणात बाभूळवन आहे. यासह यावल आणि फैजपूर रोडवरील तापीखोर्‍यांमध्येही बाभूळवनाची सर्रास तोड सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असतानाही वनविभाग आणि महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तापीखोर्‍यामध्ये मोर, ससे आदींचा गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी मुक्त संचार होता. मात्र, शहरीकरण आणि बाभूळवनाच्या तोडीमुळे वनसंपदेने नटलेला तापीखोर्‍याचा भाग आता बोडका होत आहे. दोन ते तीन महिन्यांपासून या भागात बेसुमारपणे बाभळीची तोड होत आहे. यामुळे पशू-पक्ष्यांच्या अधिवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासह खवले मांजर, ससे, मोर, सायाळ, घोरपड आदी पशूंचा अधिवास संकटात आला आहे.

वनविभागाने लक्ष द्यावे
जुगादेवी जंगलाच्या परिसरात प्राणी आणि पक्ष्यांचा वावर आहे. जंगलाचे अस्तित्व असल्याने वन्यप्राण्यांचा अधिवास या भागात टिकून आहे. मात्र, वृक्षतोड्यांच्या कारवाया वाढल्यामुळे वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने येथील वृक्षतोड रोखणे गरजेचे आहे. अंजाळे घाटातील तापीच्या खोर्‍यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात बाभूळवन तयार होते.

तोडलेल्या लाकडांची नियमितपणे होते वखार बाजारात विक्रीत
जुगादेवी जंगलाचा काही भाग वन विभाग तर काही भाग महसूल विभागाच्या अख्यतारित येतो. वनविभागाकडून या वनांच्या तोडीबाबत दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे शहरातील ही वनसंपदा आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अंजाळे परिसरातील बहुतांश लाकुडतोड करणारे व्यक्ती येथून झाडे तोडून ती बाजारात विक्रीसाठी नेत असतात. याबाबत शहरातील पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे बाभूळवनाची तोड रोखण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. या भागात नियमित गस्त सुरू केल्यास वृक्षतोडीला आळा बसेल.

जमिनीची धूप होते
नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या या वनांमुळे जमिनीची धूप थांबते. मात्र, उन्हाळ्यात या परिसरात प्रचंड तोड होत असल्याने पुढील पावसाळ्यात जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते. यामुळे या भागांमध्ये व्यापक प्रमाणात वृक्षारोपण होणे आवश्यक आहे. जमिनीवरील झाडांच्या आच्छादनामुळे मातीचा थर वाहून जात नाही. पावसाळ्यातील पाण्याच्या प्रवाहामुळे मातीच्या थराचे नुकसान झाडांमुळे टळते, त्यामुळे व्यापक प्रमाणात वृक्षारोपण गरजेचे आहे. याबाबत वनविभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.