बामखेडा परिसरात झाली कपाशीच्या लागवडीला सुरवात

0

बामखेडा । शहादा तालुक्यातील बामखेडा त.त.आदी गावासह परिसरातील कुकावल, कोठली, कळबु, सारंगखेडा, मनरद, तोरखेडा, वडाळी, खैरवे, भडगाव, अभणपुरा, देऊर, फेस, दोंदवाडे, फाकर्दा दिगर, फाकददृ खु. हिंगणी, जयनगर, कोंढावळ, धांद्रे, निंभोरा, असलोद, न्यु असलोद, खापरखेडा इ.परिसरातील गावात मे महिन्याच्या अखेरीला कपाशीच्या लागवडीला सुरवात झाली आहे. मे महिना म्हटला म्हणजे शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुट्टीचा महिना म्हणून ओळखला जात असतो. मात्र बामखेडा त.त.परिसरात कपाशी लागवड हंगामाला सुरूवात झाली असून शाळकरी मुलामुलींसाठी सुट्टीचे दिवस असून देखील कपाशी लागवडीसाठी मजुराची टंचाई असल्यामुळे लहान मुला-मुलांना देखील मजुरीला जावे लागत आहे.

बेरोजगारांना उपलब्ध झाला रोजगार
यामुळे गावातील बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. परिसरातील गावामध्ये उन्हाचा तडाखा असून देखील लहान मुला-मुलींना एकावेळेच्या मजुरीसाठी आरोग्याची पर्वा न करता पोटाची खळगी भरण्यासाठी काम करावे लागत आहे. गेल्या वर्षी परिसरात वेळेवर पाऊस न आल्याने शेतकर्‍याची कपाशी कमी प्रमाणात पिकली होती. तसेच शेतकर्‍याच्या कपाशीला योग्य भाव मिळाला नव्हता. म्हणून यावर्षी बर्याच शेतकर्यांनी कपाशीची लागवड करण्यास मागे-पुढे विचार करीत आहे. यावर्षीही वरूणराजा वेळेवर येतो की नाही ? असा प्रश्‍न शेतकर्‍यांपुढे पडलेला आहे. परिसरातील कुपनलिकातील पाण्याची पातळी खालावलेली असल्यामुळे बळीराजा देखील चांगला कोंडीत व द्विधा मनस्थितीत अडकून पडलेल्या दिसून येत आहे. नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे कपाशीची लागवड करावी की नाही अशी संभ्रम अवस्थेत शेतकरी आहे. यावर्षी सरकार माय-बाप शेतकर्याच्या पिकाला योग्य हमी भाव देईल, अशी रास्त व माफक अपेक्षा बळीराजा व्यक्त करीत आहे.