रेल्वे स्थानकातून अपहरण करीत केला चार दिवस अत्याचार
भुसावळ- यावल तालुक्यातील बामणोद येथील रहिवासी असलेल्या 22 वर्षीय महिलेवर भुसावळात सामूहिक अत्याचार (गँगरेप) झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल होवून तो लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला. बामणोद येथील पीडीत महिला घरातून संतापाच्या भरात 11 एप्रिल रोजी निघाल्यानंतर भुसावळ रेल्वे स्थानकावर आली तर दोघांनी तिचे अपहरण करून तिच्यावर चार दिवस अत्याचार केल्याचा आरोप पीडीतेने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी पीडीतेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात जावून जवाब नोंदवण्यात आला तर रविवारी तिची वैद्यकीय चाचणीदेखील करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
अपहरण करून अत्याचार केल्याची तक्रार
आईसह भावाशी वाद झाल्याने बामणोद येथील 22 वर्षीय महिला संतापाच्या भरात 11 रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावर आल्यानंतर दोन संशयीतांनी विवाहितेच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिचे अपहरण करीत तिच्यावर सलग चार दिवस अत्याचार करीत तिला पुन्हा रेल्वे स्थानकावर सोडल्याची तक्रार महिलेने केली आहे. तत्पूर्वी या महिलेला गावातील एका तरुणाने रेल्वेस्थानकावर फिरताना पाहिल्यानंतर पीडीतेच्या नातेवाईकांना कल्पना देण्यात आली नातेवाईकांनी तिचा ताबा घेत फैजपूर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवण्यात आली. या विवाहितेला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा दिड वाजेच्या सुमारास लोहमार्गचे निरीक्षक दिलीप गढरी यांनी या महिलेचा जवाब नोंदवला.
महिलेच्या जवाबात तफावत
लोहमार्गचे निरीक्षक दिलीप गढरी यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडीता दरवेळी जवाब बदलत आहे. सुरुवातीला या महिलेने दोन जणांनी रेल्वे स्थानकावरून अपहरण केल्याचा जवाब फैजपूर पोलिसांना दिला तर लोहमार्ग पोलिसांना केला सायडींगच्या बाजूला असताना संशयीतांनी आपले अपहरण करून डोळ्याला पट्टी बांधत निर्जन स्थळी नेवून अत्याचार केल्याचे तसेच काही अश्लील फोटोही काढल्याचा जवाब दिला आहे त्यामुळे नेमके काय व कसे घडले? याबाबत आम्ही खोलवर तपासणी करीत असल्याचे गढरी म्हणाले.
पोलिसांकडून फुटेजची तपासणी
लोहमार्ग पोलिसांकडून पीडीतेच्या जवाबाच्या अनुषंगाने 11 ते 13 एप्रिलदरम्यानच्या फुटेजची पाहणी केली जात आहे. या महिलेकडे तिकीट नसल्याने तिकीट निरीक्षकानेदेखील तिला हटकल्याची बाब समोर आली आहे. पीडीतेच्या तक्रारीनुसार अनोळखींनी तिचे अपहरण करून अत्याचार केल्याचे नमूद आहे तर या अनुषंगाने लोहमार्ग पोलिसांकडून बारकाईने या बाबी तपासल्या जात असल्याचे निरीक्षक गढरी म्हणाले. दरम्यान, रविवारी सायंकाळी लोहमार्गचे पोलिस उपअधीक्षक विलास नारनवर यांनी पीडीतेची भेट घेवून माहिती जाणून घेतली.