भुसावळ- यावल तालुक्यातील बामणोद येथील 22 वर्षीय महिलेवर भुसावळात अत्याचार केल्याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला होता. पीडीता वारंवार जवाब बदलत असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी तपासादरम्यान देत रेल्वे स्थानकावरील फुटेजची पाहणी केली होती. 12 रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावर पीडीता दिसत असलीतरी तिने दिलेल्या जवाबानंतर बुधवारी लोहमार्ग पोलिसांनी यावल पोलिसांची मदत घेत बसस्थानकावरील फुटेज तपासले आहेत. त्यात 8 एप्रिल रोजी तीन संशयीत पहाटे पावणेतीन वाजेच्या सुमारास पीडीतेचे अपहरण करताना आढळले आहेत शिवाय पीडीतेने ज्या भागात तिला नेण्यात आले ते घटनास्थळही दाखवले असल्याचे समजते तसेच या महिलेस बर्हाणपूर येथे नेल्यानंतर तिथेदेखील दोघांनी अत्याचार केल्याची माहिती आहे.
चार दिवस महिलेवर अत्याचार
बामणोद येथे पीडीतेने 8 एप्रिल रोजी संतापात घर सोडल्यानंतर ती यावल स्थानकावर आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना फुटेजमधून प्राप्त झाली आहे. ती संतापात बसस्थानकावर बसली असताना पहाटे पावणेतीन वाजेच्या सुमारास तीन संशयीतांनी तिचे अपहरण करीत वाहनातून तिला शहरातील एका भागात डांबून अत्याचार केल्याच्या निष्कर्षापर्यंत लोहमार्ग पोलिस पोहोचले आहेत त्यामुळे महिलेवर अत्याचार झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झाले आहे. बुधवारी जीआरपीचे निरीक्षक दिलीप गढरी व सहकार्यांनी यावल बसस्थानक गाठून तेथीच सीसीटीव्ही फुटेजची गोपनीयरीत्या पाहणी करीत फुटेज ताब्यात घेतले आहेत. पहाटे पावणेतीन वाजेच्या सुमारास तीन संशयीतांनी या महिलेचे अपहरण केल्याचे या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरातील एका भागात या महिलेला नेल्यानंतर तिथे अत्याचार झाल्याचे व त्यानंतर अन्य दोन संशयीताने या महिलेस बर्हाणपूर येथे नेवून अत्याचार केल्याचे सूत्रांनी सांगितले. गुन्ह्याची मूळ सुरुवात यावल येथून झाल्याने हा गुन्हा तपासासाठी यावल पोलिसांकडे वर्ग होण्याची शक्यता आहे.