बामणोद : बामणोद शिवारातील शेतातील विहिरी आडवे बोअर मारण्याचे काम सुरू असताना दोरखंड ठोकलेली खुटी अचानक तुटल्याने दोघे मजुर विहिरीच्या पाण्यात पडले व बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली तर शुक्रवारी दुपारी दोघांचे मृतदेह आढळले. भाऊलाल रामदास मोरे व बापू काशिनाथ कानळजे (दोन्ही रा.मोयखेडा दिगर, ता.जामनेर) अशी मयतांची नावे आहेत.
पोलिसांची घटनास्थळी धाव
विष्णू रामदास झांबरे (बामणोद) यांच्या विहिरीत आडव्या बोअरचे काम मजुरांकरवी केले होते व त्यासाठी मजुर दोरखंडच्या आधारे विहिरीत उतरले मात्र अचानक दोरखंड ठोकलेली खुंटी तुटली व मजुर विहिरीच्या पाण्यात पडले. रात्री उशिरापर्यंत मजुरांचा शोध न लागल्यानंतर शुक्रवारी सकाळी मोहिम राबवण्यात आल्यानंतर सकाळी 10.30 वाजता एकाचा तर दुसर्याचा अडीच वाजता मृतदेह आढळला. फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावक, पोलिस उपनिरीक्षक मोहन लोखंडे, सहायक फौजदार हेमंत सांगळे, पोलिस नाईक किरण चाटे, विकास सोनवणे, उमेश सानप यांनी धाव घेतली. यावल ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले तर फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.