बामणोद गावाजवळ भरधाव अ‍ॅपेरीक्षा उलटली ; म्हैसवाडीतील तरुण ठार

0

पाच दिवसात दुसरा अपघात ; अवैध अ‍ॅपे रीक्षा चालकांवर पोलीस प्रशासनाकडून कार्यवाही शून्य

फैजपूर- अवैध अ‍ॅपे रीक्षा अपघातांची मालिका कायम असून रविवारी बामणोद, ता.यावल येथे रीक्षा पलटी होऊन एका तरुण प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला तर अन्य तीन प्रवाशी जखमी झाले आहे. अर्जुन मंगल पांडव (30, रा.म्हैसवाडी, ता.यावल) असे मयत प्रवाशाचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी आमोद्या जवळ अ‍ॅपे रीक्षाचा अपघात होऊन तीन महिला ठार झाल्या होत्या. पाच दिवसात अवैध प्रवासी अपघाताची मालिका सुरू असताना कारवाईबाबत पोलिसांनी केलेली डोळेझाक ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षातून झाल्याचा उघड आरोप आहे.

अ‍ॅपे चालकासह तिघे जखमी
रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अ‍ॅपे रीक्षा (क्र.एम.एच. 19 एई 8916) बामणोद गावाजवळील (हवालदाराच्या शेरीजवळ) उलटली. या अपघातात रिक्षातील प्रवाशी अर्जुन मंगल पांडव हा तरुण जागीच ठार झाला तर प्रवाशी पंकज रवींद्र केदारे, रवींद्र प्रल्हाद केदारे व चालक गजानन पवार हे जखमी झाले आहे. जखमींवर फैजपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच हवालदार मालवीया, योगेश महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातग्रस्त रीक्षा फैजपूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. या अपघात प्रकरणी रवींद्र प्रल्हाद केदारे यांनी खबर दिल्यावरून अ‍ॅपे चालक गजानन पवार विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जिजाबराव पाटील करीत आहे.