बायकोचे सोने गहाण ठेवून भरला पीकविमा, मात्र मदतीसाठी वाऱ्या!

0

मुंबई (निलेश झालटे) : ‘पत्नीचे सोने गहान ठेवून पीक विम्याचे पैसे सोसायटीला भरले. पीक तर गेले पण विमा मिळाला नाही. एक वर्ष झाले कृषी अधिकारी ते मंत्रालय अशा हेलपाटे घालून जीव मेटाकुटीला आलाय. आता आत्महत्या करण्याशिवाय काही पर्याय नाही.’ हे शब्द आहेत रावण पाटील राहणार आडळसे तालुका भडगाव जिल्हा जळगाव यांचे. दुपारी कृषिमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर फिरताना दिसले. विचारपूस केली तर त्यांची ही कैफियत समोर आली. यावर्षी भीषण दुष्काळ आणि बोन्डअळीने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत शासकीय मदत तर दूरच पण निदान हक्काचे पैसे मिळावे हीच मागणी रावण पाटील करत आहेत.

नजीकच्या गावांना मिळाला विमा
रावण पाटील हर आडळसे गावचे रहिवासी. 2016 साली त्यांनी आपल्या बायकोचे दागिने गहाण ठेऊन पीकविमा भरला मात्र त्यांना मदत काही मिळाली नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून ते मंत्रालयात पीक विमा मिळावा म्हणून दाद मागत आहेत. 2016-17 मध्ये पीक विमा भरण्यासाठी पत्नीचे दागिने विकले. दुष्काळात पीक गेले, नजीकच्या गावांना पीक विमा मिळाला. पण अनेक शेतकऱ्यांना सर्व्हे होऊन पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. तालुका कृषी अधिकारी ते मंत्रालय खेटे मारून झालेत मात्र दखल घेतली जात नाही असे रावण पाटील यांचे म्हणणे आहे.

आत्महत्या करण्याचा इशारा
बायकोचे दागिने गहाण ठेवून पीकविमा भरलाय. पीकही गेले आणि मदतही मिळाली नाही. अधिकाऱ्यांपासून ते मंत्रालयापर्यंत खेटे घालूनही हक्काची मदत मिळत नाहीये. आता आत्महत्या करण्याशिवाय काही पर्याय उरलेला नाही अशा शब्दात रावण पाटील यांनी जनशक्तिशी बोलताना आपली व्यथा मांडली. या संदर्भात कृषिमंत्री, अर्थमंत्री, महसूल मंत्री यांच्याकडे वारंवार खेटे घालून देखील दखल घेतली जात नसल्याचे ते म्हणाले.