बायखेडा वाळू घाटातून अवैध मार्गाने वाळूची वाहतूक सुरु

0

शहादा (भरत शर्मा) : शहादा महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ फेकून बामखेडा (त.सा.) येथून वाळू घाटधारकांकडून हजारो ब्रास वाळूची वाहतूक प्रशासनाच्या डोळ्यादेखत होत आहे. मात्र असे असूनही प्रशासनाच्या मिलीभगतमुळे तापी नदीचे मात्र, अतोनात नुकसान होत आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचाही र्‍हास होत असून अवैध मार्गाचा अवलंब होत असल्याने शहादा तालुक्यातील रस्त्यांचेही अतोनात होत आहे.

शासनाद्वारे लिलाल करतांना वाळू घाट घेणाया ठेकेदारास शासन निर्णय 12 मार्च 2013 अटी शर्तीनुसार व पर्यावरण समितीच्या मान्यतेनुसार व शर्तीच्या अधिन राहून सदर वाळू घाट ठेकेदारास देण्याची मान्यता असतांनाही सदर ठेकेदाराकडून शासनाच्या सगळ्या अटी, शर्ती व नियमांना पायदळी तुडवून सदरच्या ठेकेदाराकडून वाळूचा उपसा सुरु आहे. शासनाने बामखेडा (त.सा.)येथे 11873 ब्रास वाळूचा उपसा करण्याची परवानगी दिलेली आहे. त्यासाठी ठराविक यंत्रसामुग्रीद्वारेच तो उपसा करण्याची अट असतांनाही सदर ठेकेदारामार्फत मात्र, मनमानीचे वाळू उपसा सुरु आहे.

आजमितीस ह्या वाळू घाटावर 25 ते 30 बोटींद्वारे वाळू उपसा सुरु असल्याने बोलले जात आहे. त्याचबरोबर ह्या हिशोबाने एका बोटीद्वारे 200 ब्रास वाळूचा उपसा प्रतिदिन होतो. त्याहिशोबाने 30 बोटीद्वारे 6 हजार ब्रास वाळू एका दिवसात काढली जाते आणि ही उपसा केलेली वाळू 12 पोकलँडद्वारे 6,10,12, चाळी वाहनांमध्ये भरण्यात येते. 6 चाकी वाहनात साडेतीन ब्रास, दहाचाकी वाहनात 8 ते 10 ब्रास आणि 12 चाकी वाहनात 13 ते 14 ब्रास वाळू भरण्यात येते. एका ब्रास वाळूचे वजन साडेचार ते 5 टनापर्यंत असते. त्यामुळे 6 चाकी वाहनात 18 टनापर्यंत वजन लादण्यात येते. दहा चाकी वाहनात 45 टनापर्यंत तर 12 चाकी वाहनांमध्ये 55 ते 60 टनापर्यंत वाळूची वाहतूक करण्यात येते.

ग्रामीण भागातील अगोदरच हलाखीच्या परिस्थितीतील रस्त्यांवरुन एवढी अवजड वाहतूक करणारी वाहने चालविल्यामुळे हे रस्ते अगदी मोडकळीस आलेले आहेत आणि त्यात ह्या वाहनांमुळे व वाहनचालक तसेच वाळूघाट धारकाच्या मनमानीमुळे ह्या रस्त्यांची अजून जास्त दुर्दशा होत आहे. वाळूघाटधारक सर्रास ओल्या वाळूची वाहतूक करीत असल्याने रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढते आहे. याप्रमाणे शहादा परिसरात होणारी वाळूची वाहतूक बेशिस्तीने केली जात असते. परिसरात होणारनी ट्रकमध्ये भरलेल्या वाळूवर कोणतेच आच्छादन नसते. त्यामुळे ह्या वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांच्या मागे दुचाकीस्वारांना वाहन चालवणे खूपच धोकादायक ठरते. कारण वाहनामधून हवेमुळे उडणारे वाळूचे कण सरळ डोळ्यात जातात आणि त्यामुळे हमखास अपघात घडत असतात. ही वाहने खूप बेशिस्तपणाने रस्त्यावर धावत असतात. त्यामुळे परिसरात वाहने चालविणे धोक्याचे ठरत आहे.

वाळू चोरीचा दुसरा भाग म्हणजे महसूल प्रशासन, महसूल प्रशासनाच्या डोळ्यादेखत हे घडत असूनही प्रशासन मात्र शांतपणे हा खेळ बघत आहे. रोज हजारो ब्रास वाळू प्रशासनाच्या देखरेखीखाली वाहतूक केली जात आहे. त्याची म्हणजे ‘रॉयलटी’ची तपासणी कोण करते. शहादा परिसरात होणारी वाळूची वाहतूक तर बीना रॉयलटीची होते. ह्या सगळ्यांसाठी जबाबदार कोण? महसूल विभागाच्या अधिकार्‍यांच्या संगनमताशिवाय हे शक्यच होऊ शकत नाही. दिवसभरातून शेकडो वाळूची वाहने रस्त्यावर दिसतात. ही वाहने सामान्य नागरिकांना दिसतात. मात्र, महसूल विभागाच्या कर्तृव्यदक्ष अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना दिसत नाहीत, केवढे मोठे आश्‍चर्य म्हणावे. ह्या सगळ्यांना एकाच रॉयलटीच्या पावतीचा वापर अनेक वेळा करण्यात येत असल्याचे सामान्य नागरिक बोलतात. ह्या वाळू घाटधारकांचे अधिकार्‍यांशी एवढे लागेबांधे असतात की, ज्या दिवशी कोणी मोठा अधिकारी भेट देणार असतो त्या दिवशी नेमके इथे गाड्या नसतात. याचा अर्थ जिल्हाधिकारी कार्यालयात फुटीखादी आहेत का? याचा विचारही प्रशासनाने करावयास हवा.