पिंपळे गुरव व पिंपळे सौदागार भागात राबविणार प्रकल्प
प्रायोगिक तत्त्वावर 200 सायकल देणार उपलब्ध करुन
पिंपरीः स्मार्ट सिटी योजनेअंतर्गंत पायलट प्रोजेक्ट म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात ‘बायसिकल शेअरिंग’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. खासगी कंपन्यांच्या माध्यमातून पिंपळे गुरव व पिंपळे सौदागार भागात लवकरच हा प्रकल्प सुरू होणार आहे. त्यासाठी 350 सायकली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. हा प्रकल्प 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी सुरु करण्याचे नियोजित आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाल्यानंतर या योजनेतील संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने प्रयत्न सुरु आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नागरिकांना सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘बायसिकल शेअरिंग’ ही योजना राबविण्याच्या नियोजनाची बैठक आयुक्त दालनात नुकतीच पार पडली. या बैठकीला महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहशहर अभियंता राजन पाटील, आयुबखान पठाण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण व विविध सायकल कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नाममात्र दरात सायकल उपलब्ध
महापालिकेच्यावतीने स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात पिंपळे सौदागर व परिसरात ही योजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेकरिता नाममात्र दरात सायकली उपलब्ध करुन देण्याची यूलू, पेडल, मोबीसाईल आणि मोबिक या चार सायकल कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. आयुक्त कार्यालयात पार पडलल्या बैठकीला या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी 200 सायकली उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शविली आहे. याकरिता प्रति तास नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. हे भाडे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे.
नागरिकांनी कमी अंतराच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पिंपळे सौदागरमधील बी.आर.टी.एस. मार्गालगत महापालिका प्रशासनाने सायकल उभ्या करण्यासाठी केवळ जागा उपलब्ध करुन द्यावयाची आहे.
अनेक सायकल कंपन्यांची तयारी
याशिवाय अनेक उच्चभ्रू सोसायट्यांच्या आवारात सायकली उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ही बाब या सोसायट्यांच्या अखत्यारितील आहे. मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण म्हणाले की, या योजनेत सहभागी होण्यासाठी चार सायकल कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. याकरिता पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर एकूण 200 सायकली उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत