बायोमेट्रिक ओळखीनेच शिधावस्तूंचे होणार वितरण

0

धुळे । शिधापत्रिकेवरील धान्यासाठी या महिन्यापासून आधार कार्ड अत्यावश्यक आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. हुलवळे यांनी म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यात संपूर्ण संगणकीकरण प्रकल्पांतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेत संगणकीकरण प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पांतर्गत सर्व रास्त भाव दुकानात ई-पॉस मशीन बसविण्यात आल्या आहेत. त्याद्वारे पात्र लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटविल्यानंतरच शिधावस्तूंचे वितरण करण्यात येणार आहे.

…यांची रुट ऑफिसर नॉमिनी म्हणून नियुक्ती
मे 2018 पासून पॉस मशीनमध्ये आधार इनबिल्ड पब्लिक डिस्ट्रिब्यूशन सिस्टिम ही नवीन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीत रास्त भाव दुकानातील ई-पॉस मशीनद्वारे कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचे आधार ऑथेन्टिकेशन झाले, तरच धान्य वितरण करण्यात येणार आहे. -आधार ऑथेन्टिकेशन झाले नाही, तर ई-केवायसी करुन प्रथम शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडला जाईल. त्यानंतरच धान्य वितरीत केले जाईल. आधार सिडींग नसलेल्या सदस्याचे ई-केवायसी करुन धान्य वितरण करण्यात येईल. ज्या लाभार्थ्यांच्या बाबतीत वरील दोन्ही पर्याय शक्य नसल्यास त्यांच्यासाठी त्या गावातील तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक किंवा पोलीस पाटील यांची रुट ऑफिसर नॉमिनी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

धान्य वाटपामध्ये येईल पारदर्शकता
या प्रणालीमुळे रास्त भाव धान्य वाटपामध्ये पारदर्शकता येवून सर्व लाभार्थ्यांना नियमित व दरमहा योग्य प्रमाणात धान्य मिळण्याची हमी मिळणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आधार क्रमांक जमा केलेला नसेल त्यांनी आपला आधार क्रमांक तात्काळ तहसील कार्यालय अथवा संबंधित रास्त भाव दुकानदाराकडे जमा करावा, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. हुलवळे यांनी नमूद केले आहे.