‘बायोमेट्रीक’मुळे अर्ज भरण्याच्या कामांना वेग

0

पुरंदर । शेतकर्‍यांचे कर्जमाफिचे अर्ज भरण्याची प्रक्रीया सध्या नीरा परिसरात सुरू आहे. येथे बायोमेट्रिक मशीनचा वापर केला जात असल्यामुळे अर्ज भरण्याच्या प्रक्रीयेला वेग आला आहे.

गेल्या आठवड्यात तालुक्यातील आठ महा ई-सेवा केंद्र व एका सेतू केंद्रात मिळून केवळ 95 अर्ज भरण्यात आले होते. एकीकडे आधार कार्ड मोबाईलला लिंक नसल्याने ओटीपी जनरेट होत नव्हता, तर दुसरीकडे पती व पत्नी दोघांचे कार्ड मोबाईल क्रमांकाला लिंक नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. सेवा केंद्रांवर बायोमेट्रिक मशीन देण्यात आली होती. मात्र, वेगळ्या कंपनीचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी आलेले शेतकरी माघारी परतत होते.

नीरा येथे गणेश कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरमध्ये बायोमेट्रिक मशीन सुरू करण्यात आली आहे. दोन-तीन दिवसांत येथे 150 अर्ज भरल्याची माहिती केंद्रचालक नितीन भोसले यांनी दिली. येथील महा ई-सेवा केंद्रावर 34 अर्ज भरल्याची माहिती केंद्रचालक प्रमोद कदम यांनी दिली. नीरा येथे परिसरातील गुळुंचे, कर्नलवाडी, राख, पिंपरे, माडेगाव, निंबुत येथील शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरण्यास येत आहेत. कर्जमाफीचा अर्ज नेटवर स्वतःलाही भरता येऊ शकतो. मात्र, अनेक शेतकर्‍यांना ऑनलाईन प्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्याने सेवा केंद्रांवर गर्दी होत होती.

सेवा केंद्रातील बायोमेट्रीक मशीनला आवश्यक असलेले सॉफ्टवेअर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. काही ठिकाणी ते इन्स्टॉल झाले आहे. वयोवृद्ध व्यक्तींच्या हाताचे ठसे व्यवस्थित उमटत नसल्याने त्यांना आधार कार्ड लिंक करण्यासाठी चकरा माराव्या लागत आहेत.