कल्याण : ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे दुपटीने धरणाची उंची वाढविण्यात आल्याने धरणात 340 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होऊ शकतो खरा या धरण क्षेत्रात बाधित होणार्या 2 गावासह 5 पाड्यांमध्ये राहणार्या 120 कुटुंबाचे पुनर्वसन अद्याप न झाल्याने यंदाही मागील वर्षा इतकेच म्हणजे 236.50 दशलक्ष घनमीटर इतकाच पाणीसाठा धरणाच्या पात्रात साठवता येणार आहे.
बदलापूर येथे असलेल्या बारवी धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 181 दशलक्ष घनमीटर इतकी होती. मात्र मागील 14 वर्षात ठाणे जिल्ह्यासह ग्रामीण भागातील लोकसंख्या कमालीची वाढल्याने धरणातील पाणीसाठा अपुरा पडत होता. त्यामुळे नागरिकांची वाढीव पाण्याची मागणी लक्षात घेता बारवी धरणाची उंची दुपटीने वाढविण्याचा निर्णय लघु पाटबंधारे विभागाकडून घेण्यात आला होता. यानंतर या धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरु होते. 2015 साली या धरणावर 11 स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आल्यानंतर धरणाची पाणी साठवण क्षमता 181 दशलक्ष घनमीटरवरून 340 दशलक्षघनमीटर इतकी वाढली आहे.
रहिवाशांचा जीव धोक्यात
165 किलोमीटर इतक्या परिसरात पसरलेल्या या धरणाचा विस्तार देखील यामुळे आणखी वाढणार असून यात सुकाळवाडी, मोहघर, तोंडली 1 व 2, काचकोली, कोडेवडखळ, मानिवली या 7 गावासह या गावांना संलग्न असलेले 5 पाडे विस्थापित झाले आहेत. यातील आतापर्यत 1105 कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात आले असले तरी तोंडली आणि काचकोली या दोन गावासह आजूबाजूच्या पाड्यामध्ये राहणार्या 120 कुटुंबानी नव्या बाजार भावाप्रमाणे मोबदला मिळावा आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी मिळावी या दोन मागण्या पूर्ण होईपर्यत राहती घरे सोडण्यास नकार दिल्यामुळे या रहिवाशाचा जीव धोक्यात आला आहे.
गावामध्ये पूरस्थिती
रविवारी धरणाच्या पात्रात 236.50 एमएलडी पाणीसाठा असून त्यापेक्षा अधिक पाणीसाठा केल्यास बाधित गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती असल्यामुळे धरणाच्या सर्वात पहिल्या दरवाजातूनच पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. मागील वर्षी देखील धरण भरल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून एमआयडीसीकडून या पुरग्रस्तांसाठी मुरबाड येथे तात्पुरते तंबू उभारण्यात आले होते. मात्र पावसाळा संपताच पुन्हा या रहिवाशांनी जुन्या घरांचा ताबा घेतला होता. यामुळे यंदाही या रहिवाशाच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला असून एमआयडीसीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्कालीन विभागाला या नागरिकाच्या पुनर्वसनाबाबत निर्णय घेण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप या बाधितांच्या पुनर्वसनाचा तिढा कायम असल्यामुळे यंदाही धरणाच्या पात्रात शेवटच्या दरवाजा इतके म्हणजे अपेक्षित 340 एमएलडी पाणी साठवता येणार नसल्याचे एमआयडीसीचे म्हणणे आहे.
पाठीसाठा करणे अशक्य
सध्या उल्हास नदी पात्रात देखील पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे बारवी आणि आंध्र धरणातून उल्हास नदीत पाण्याचा विसर्ग केला जात नसला तरी नोंव्हेबरपासून धरणाचे पाणी नदी पात्रात सोडले जाते. मात्र जुलै अखेर पर्यत हे पाणी पुरविता यावे यासाठी पाणी कपातीचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागत असून यंदाही ऑगस्ट आणि सप्टेबर महिन्यात पडणारे पावसाचे पाणी नदीत वाहून घालवावे लागणार आहे. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न जोपर्यत मार्गी लागत नाही तोपर्यत धरणाची उंची वाढविल्या नंतरही धरणाच्या पात्रात अपेक्षित पाणीसाठा करणे अशक्य असल्याचे एमआयडीसी अधिकार्यांनी स्पष्ट केले असून पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबधित विभागाला अनेकदा पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले.