बारामतीकरांच्या घरपट्टीत 20 टक्क्यांनी वाढ

0

बारामती । बारामती नगरपालिकेने जळोची, तांदूळवाडी, रूई, खंडोबानगर, माळेगाव कॉलनी, बारामतीचा ग्रामीण भाग या वाढीव हद्दीतील नागरीकांना 2017-18 ते 2020-21 या कालावधीसाठी सरसकट 20 टक्के घरपट्टी वाढवून दिल्याच्या नोटीसा पाठवल्या आहेत. या नोटीसांवर मिळकतदारांनी व नागरीकांनी हरकत घ्यावयाची आहे. ही वाढ भरमसाठ असून नागरीकांना न परवडणारी आहे. नगरपालिका दर वर्षी अशा स्वरुपाची वाढ करून नागरीकांना त्रास देत असते. ही घरपट्टी कमी करण्यासाठी बारामती विकास आघाडीच्यावतीने विनामुल्य मार्गदर्शन केले जाणार आहे. या मार्गदर्शनात ही भाडेवाढ चूकीची असून अन्यायकारक असल्याचे सप्रमाण सिध्द केले जाणार आहे. यासाठी नागरीकांनी हरकती घेतल्या पाहिजेत, असे आवाहन बारामती विकास आघाडीने केले आहे.

नगरपरिषदेने आकारलेल्या बेकायदेशीर वाढीव घरपट्टीवर मिळकतदारांनी हरकत घेतली नाही. तर पुढील चार वर्षासाठी वाढीव घरपट्टी आपणास मान्य आहे, असे समजण्यात येईल. बारामती नगरपरिषद वाढीव हद्दीतील मिळकतदारांना व नागरीकांना हरकत घेण्यासाठी बारामती नगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात मार्गदर्शनासाठी व अर्ज भरून घेण्यासाठी कक्ष उघडण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते, ज्येष्ठ नगरसेवक अशोक काका देशमुख, नगरसेवक जयसिंग देशमुख, विष्णुपंत चौधर, प्रशांतनाना सातव, किशोर मासाळ, अजित साळुंखे, संदिप मोहिते, जहिर पठाण, सुरेंद्र जेवरे, हेमंत नवसारे, शाकीरभाई बागवान, सुजित वायसे, नाना भगत, भिवा मलगुंडे, मुकूंद करे, बलभिम जाधव, संदिप बनकर आदी मान्यवर यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.