पुणे/बारामती : पुण्यातील मुंढवा परिसरात शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी काही पोलिस अधिकारीच जुगार खेळताना आढळून आले. या घटनेमुळे जिल्हातील पोलिस दलात मोठी खळबळ उडाली होती. विजय जाधव असे अटक करण्यात आलेल्या अधिकार्याचे नाव असून, ते बारामती शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक आहेत. त्यांच्यासह अनेकांना पोलिसांनी पकडले आहे. क्लब चालक माजी नगरसेवक अविनाश जाधव यांच्यासह 41 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झोन-2 चे पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, जाधव यांच्या अटकेने बारामती पोलिस ठाणेदेखील अडचणीत आले असून, येथेही जाधवांनी अवैध धंद्यांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनाच जुगार खेळताना अटक झाल्याने शनिवारी बारामती पोलिस ठाण्यात सन्नाटा पसरला होता.
मुंढव्यातील कपिल मॅट्रिक्स इमारतीत नाईट क्लब
मुंढव्यातील हा नाईट क्लब माजी नगरसेवक अविनाश जाधव चालवत आहे. मुंढवा परिसरातील कपिल मॅट्रिक्स इमारतीमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिमंडळ (झोन)-2 चे पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी पोलिस निरीक्षक जाधव यांच्यासह 41 जणांना पोलिसांनी पकडले. घटनास्थळावरून 7 लाखांची रोकड, 4 चार चाकी आणि दुचाकी वाहने, टीव्ही असा जवळपास 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाईट क्लबमधील जुगार अड्ड्यावर एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक आढळल्याने पुणे पोलिस दलात खळबळ माजली आहे. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, अप्पर पोलिस आयुक्त रवींद्र सेनगवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
बारामतीतही जाधवांचे अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष
बारामती शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक विजय जाधव यांना अटक केल्यामुळे बारामती शहर पोलिस स्टेशनच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बारामती शहर व ग्रामीण पोलिस स्टेशनची सखोल चौकशी करण्यात येईल अशी माहिती समजते आहे. शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून शहरातील वाहतुकीची अक्षरश: वाट लागली आहे. मात्र याबाबत नागरीकांनी सातत्याने तक्रारी करूनदेखील जाधव यांनी याकडे दुर्लक्ष केले. बारामती शहर पोलिस स्टेशनला अवैध धंदे करणार्यांचा सतत राबता दिसून येतो आहे. जाधव हे पोलिस स्टेशनच्या बाहेर क्वचितच दिसून येत होते.
फौजदार जाधव यांच्यावर राजकीय वरदहस्त
जाधव यांना इंदापूर येथील एका राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्याचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांचे बारामतीच्या अवैधधंद्यावर व गंभीर अशा वाहतूक व्यवस्थेवर दुर्लक्षच होते. बारामती शहरात वाहतूक पोलिस दाखवा यावर नागरीक पैजा लावताना दिसत होते. इतका भयावह कारभार जाधव यांच्या कारकीर्दित बळावला होता. जाधव यांच्या अटकेमुळे बारामती शहरात नागरीकांमध्ये जोरात चर्चा सुरू झाली आहे. याबाबत डीवायएसपी बापू बांगर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही. बारामती शहर पोलिस स्टेशनमध्ये याबाबत अत्यंत गोपनीयता पाळली जात असून सन्नाटा पसरला आहे.