बारामतीच्या नगराध्यक्षांचा राजीनाम्याचा इशारा

0

विरोधी पक्षनेत्यांचा अकार्यक्षम असल्याचा आरोप

बारामती : नगरपालिकेची सभा सुरू असताना अकार्यक्षम नगराध्यक्ष असा उल्लेख विरोधी पक्षनेत्यांनी केल्याने संतप्त झालेल्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी थेट राजीनाम्याचाच इशारा दिला. त्यामुळे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी अखेर शब्द मागे घेत प्रशासनाला लेखी तंबी देण्याची मागणी केली.

नगराध्यक्षांनी गुरुवारी रौद्र रुप दाखवित नगरसेवकांना खडे बोल सुनावले. सुनील सस्ते यांनी नगराध्यक्षांवर अकार्यक्षम असल्याचा आरोप केल्यानंतर मात्र तावरे यांच्या संयमाचा बांध फुटला. मी गेली दहा वर्षे या सभागृहात आहे, प्रत्येकाचा मी सन्मान केला आहे, गेल्या बैठकीला माझ्यावर प्रशासनाची बाजू घेता असा आरोप केला गेला, तुम्ही सगळ्यांनी या नगराध्यक्षा नको, असे आम्हाला लिहून द्या.

काम मलाही करायच आहे, मीही माझ्या प्रभागाच दहा वर्षे काम करतेय, लागोपाठ दोनदा निवडून आले आहे, मी सहा नगराध्यक्षांच्या हाताखाली काम केले आहे, पण कोणत्याही नगराध्यक्षांनी सांगावे की पौर्णिमा तावरे यांनी मला असे टॉर्चर केले आणि त्रास दिला, सगळ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करते, असे असूनही माझ्यावर अकार्यक्षमतेचे आरोप कसे काय करू शकता? असे खडे बोल सुनावत कधीच कुठल्याही चुकीच्या गोष्टीला मी पाठीशी घालणार नाही, असे तावरे यांनी सांगितले.

नगराध्यक्षांच्या कामाचे अभिनंदन

उद्विग्न नगराध्यक्षांच्या पाठिंब्यासाठी महिला नगरसेविकाही पुढे सरसावल्यानंतर सुनील सस्ते यांनी शब्द माघारी घेतले व प्रशासनाला लेखी तंबी द्यावी, अशी मागणी केल्यानंतरच सभा पुढे सुरू राहिली. सभा संपताना संजय संघवी यांनी नगराध्यक्षांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला आणि त्यांनी योग्य पध्दतीने कामकाज केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

अशोककाका देशमुख यांचा राजीनामा

प्रभाग नऊमधील विविध विकासकामे होत नसल्याच्या निषेधार्थ ज्येष्ठ नगरसेवक अशोककाका देशमुख यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा सुपूर्द केला. शौचालयाव्यतिरिक्त इतर कामे झालेली नाहीत, बारामती हॉस्पिटलच्या रस्त्याची वर्क ऑर्डर दिलेली नाही, बांधकाम, आरोग्य व उद्यानविभागातून नियमबाह्य कामे झालेली आहेत, त्याची चौकशी व्हावी, चौकशीअंती नियमाबाह्य कामे झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुध्द खातेनिहाय चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. नियमबाह्य कामे आढळली नाहीत तर माझा राजीनामा मंजूर करण्यात यावा, अशी विनंती देशमुख यांनी पत्रात केली आहे.