बारामतीच्या साखरेने हवामान खात्याचे तोंड गोड!

0

पुणे : गत आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज वर्तविणार्‍या हवामान विभागाची जोरदार खिल्ली उडवत, माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तसे झाले तर हवामान खात्याचे तोंड बारामतीच्या साखरेने गोड करेल, असे विधान केले होते. गत आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवस पुणेसह राज्यभरात जोरदार पाऊस झाल्याने आता साखर कधी देता? अशी विचारणा पवारांना होऊ लागली होती. त्यानुसार काल दुपारी चार वाजेच्या सुमारास पवारांनी 50 किलोचे साखरेचे पोतेच हवामान खात्याच्या पुणे ब्युरो कार्यालयात आपल्या कार्यकर्त्यांकरवी पाठवून दिले. या कार्यकर्त्यांनीही ब्युरोप्रमुख ए. के. श्रीवास्तव यांच्यासह इतर कर्मचार्‍यांचे तोंड गोड केले. पवारांनी आपला शब्द पाळला, असे संदेशही यानंतर सोशल मीडियावर जोरदारपणे व्हायरल झाले. आता या 50 किलोच्या साखरेच्या पोत्याचे काय करावे? असा प्रश्न ब्युरोप्रमुखांना पडला आहे. आपण सरकारी नोकर असल्याने अशाप्रकारची गिफ्ट स्वीकारू शकत नाही, असेही ब्युरोप्रमुख श्रीवास्तव यांनी सांगितले.

पहिल्यांदाच हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा!
पावसाअभावी खरिपाची पिके धोक्यात आली असताना, हवामान खात्याच्या पुणे ब्युरोने पावसाबाबत यापूर्वी व्यक्त केलेले काही अंदाज चुकले होते. त्यातच त्यांनी गतआठवड्यात चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. या अंदाजावर शरद पवारांनी खोचक टिपण्णी केली होती. चार दिवसांत चांगला पाऊस पडला तर कर्मचार्‍यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, असे ते म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर खरेच 24 तासांत पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्यातील बहुतांश भागात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. हवामान खात्याचा अंदाज पहिल्यांदाच असा तंतोतंत खरा ठरल्यानंतर पवार आता साखर कधी वाटणार? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यानुसार, राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांच्या नेतृत्वात पवारांनी बारामतीची साखर हवामान खात्याच्या कार्यालयात पाठवली व आपला शब्द पाळला. चार वाजेच्या सुमारास सर्व कर्मचार्‍यांना साखर वाटून त्यांचे तोंड गोड करण्यात आले. 50 किलोचे साखरेचे पोतेच पुणे ब्युरो कार्यालयास देण्यात आले आहे. आता या पोत्याचे काय करावे, असा प्रश्न मात्र ब्युरोप्रमुखांना पडला होता.

पोते कसे घेऊ? निलंबन तर होणार नाही ना?
हवामान खात्याचे पुणे ब्युरोप्रमुख ए. के. श्रीवास्तव म्हणाले, की पोतेभर आलेल्या या साखरेचे काय करावे, याबाबत काहीच शासकीय आदेश नाहीत. आम्ही त्यांना सांगितले होते, की आम्ही सरकारी नोकर आहोत, असे पोते वैगरे देऊ नका, तरीही ते हे पोते कार्यालयात ठेवून गेले आहेत. आता हे पोते स्वीकारले तर आपले निलंबन होऊ शकते, अशी भीतीही श्रीवास्तव यांनी व्यक्त केली. बारामतीची साखर तोंडात टाकून पवारांनी अधिकारीवर्गासह सर्व कर्मचारीवर्गाचे तोंड गोड करत आपला शब्द पाळल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.