बारामतीतील गुटखा छापासत्र वादात

0

बारामती । बारामती तालुक्यातील बांदलवाडी, पिंपळी लिमटेक, काटेवाडी, भवानीनगर या ग्रामीण भागातील छोट्या-छोट्या टपर्‍यांवरील गुटखा विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाच्या आधिकार्‍यांनी छापे टाकले होते. मात्र हे छापासत्र पोलिस व अन्न, औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांच्या वादामुळे चांगलेच रंगले आहे. त्यामुळे छाप्यात जमा केलेल्या रकमेवर पाणी सोडावे लागणार असून टपरीधारकांनाही सोडावे लागणार आहे. त्यामुळे हे छापासत्र अयशस्वी ठरले आहे.

गुटखा मिळतो कुठून?
अन्न व औषध विभागाच्या तीन अधिकारी व कर्मचार्‍यांनी बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील टपर्‍यांवर गुटखा तपासण्याचे सत्र सुरू केले. या टपर्‍यांवर गुटखा विकला जातो हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मुळात या टपर्‍या विक्रेत्यांना गुटखा कोठून मिळतो हे महत्त्वाचे आहे. या पथकाला प्रत्येक टपरीवर गुटखा मिळाला. पथकाने तो गुटखा जप्तही केला. या टापरी दुकानदारांना घेऊन हे पथक बारामती ग्रामीण पोलिस ठाण्यात आले. यात दुकानदार काही महिलाही होत्या.

परीसरात रंगली चर्चा
दरम्यान, काटेवाडीत एका गृहस्थाने या टपरीधारकांना सांगितले, तुम्हाला खूप त्रास होईल. अधिकार्‍यांना काहीतरी द्यावे लगेल. यावर हे टपरीधारक नको ते झेंझट म्हणून एक हजारापासून पाच हजारापर्यंत रक्कम देण्यास तयार झाले. त्या गृहस्थाकडे पैसे जमाही केले. मात्र, पोलिस स्टेशनवरील गोंधळानंतर टपरीधारक पैसे न देताच घरी आले. आल्यानंतर दुसर्‍यादिवशी या गृहस्थाकडे गेले. त्यांनी आमचे पैसे परत दे अशी मागणी करून घडलेली हकीकत सांगितली व लगेचच टपरीधारकांचे पैसे परत केले. या घटनेची परिसरात चांगली चर्चा रंगली. आता टपरीधारक गुटखा विकणार नाहीत, असे यातील काहींनी सांगितले.

गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ
बारामती शहर पोलिस स्टेशनला हे पथक व दुकानदार दुपारच्या दरम्यान येऊन पोहोचले होते. परंतू त्यांची कोणीच दखल घेतली नाही. अन्न व औषध विभागाच्या पथकाने या दुकानदारांचे जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना सांगितले. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेरीस सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान गुटखा विक्रेत्या महिलांनी एका महिला पोलिस अधिकार्‍याच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यामुळे पोलिस अधिकार्‍यांची चांगलीच भांबेरी उडाली. यावेळी अन्न व औषध विभागाचे पथक व पोलिस यांच्यात शाब्दीक चकमक झाली. ही दाटी कोणाची? हा अधिकार तुम्हाला आहे का? असे प्रश्‍न पथकाला विचारून चकमक झाली. अखेरीस या सर्व टपरी दुकानदारांना रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान सोडून देण्यात आले. त्यांना पुन्हा गुटखा विकू नका, अशी उपदेशवजा समज देण्यात आली.