बारामतीतील झारगडवाडीत सहाजणांवर सावकारीचा गुन्हा दाखल

0

पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई : खासगी सावकारांवर कडक कारवाईचे धोरण

बारामती : पुणे ग्रामीणच्या अधिकार्‍यांनी बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे कारवाई करीत एकाच घरातील गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या सहा जणांवर सावकारीचा गुन्हा दाखल केला. पुणे ग्रामीण पोलिसांच्यावतीने ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी रुद्रावतार घेतल्याने गुन्हे शोधपथकाच्या कर्मचार्‍यांनी गुन्हा दाखल होताच अवघ्या एक तासात सर्व आरोपींना जेरबंद केले. पुणे ग्रामीण पोलीस अधिकक्षक संदीप पाटील यांची खासगी सावकारांवर कडक कारवाईचे धोरण आखले आहे. पुणे जिल्ह्यातील ही पहिली आणि मोठी कारवाई ठरली आहे. आज्या हंकार्‍या भोसले, बेबट्या आज्या भोसले, दत्त्या आज्या भोसले, विज्या आज्या भोसले, अश्‍विनी बेबट्या भोसले, चैत्री आज्या भोसले अशी त्यांची नावे आहेत. हे सहाहीजण अट्टल सावकार होते. याबाबत संजय सर्जेराव पवार (वय 44, रा. जळोची) यांनी फिर्याद दिली आहे.

असे आहे प्रकरण

संजय पवार यांना पैशांची गरज होती त्यासाठी व्याजाने पैसे घेण्यासाठी त्यांनी शैलेश थोरात यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा हंगार्‍या भोसले व त्याचा मुलगा विज्या भोसले हे व्याजाने पैसे देत असल्याचे त्यांना समजले. परंतू हमी म्हणून दोन कोरे धनादेश व आधार कार्ड ते घेत असल्याचे थोरात यांनी सांगितले. पवार आवश्यक कागदपत्र घेऊन 27 एप्रिल 2018 रोजी आज्या भोसलेच्या घरी गेले. व्याजाने 20 हजार रुपये त्यांनी मागितले. भोसले यांनी दरमहा शेकड्याला 10 रुपये व्याज घेणार असल्याचे सांगत 20 हजार रुपयांना महिन्याला 2 हजार रुपये द्यावे लागतील तसेच मुदतीत व्याजाचे पैसे नाही मिळाले तर महिन्याचे व्याज आठवड्याला द्यावे लागेल, असे सांगितले. पवार यांनी अटी मान्य केल्या. त्यांनी पवार यांच्याकडून आधारकार्ड व दोन धनादेश सही करून घेतले.

महिलेचा विनयभंग

पवार यांच्या पत्नीला भोसलेने मोबाईलवरून हा प्रकार सांगितला. पवार यांची पत्नी झारगडवाीत आली. त्यावेळी तिने 12,500 रुपये आणले होते. भोसले यांनी हे पैसे आणि गाडीही हिसकावून घेतली. पवार यांच्या पत्नीचा विनयभंग करून मारहाण केली. तसेच पवार यांच्या पत्नीच्या गळ्यातील 10,940 किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्रही हिसकावून घेतले. जीव वाचवून पवार कुटुंबीय घरी आले व हा प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली.

20 हजारावर महिन्याला 4 हजार रुपये व्याज

28 एप्रिल 2018 ला पवार भोसलेच्या घरी गेले. त्यावेळी 20 रुपये शेकड्याने व्याज देण्याची मागणी त्यांनी केली. पैशांची गरज असल्याने पवार यांनी ही अट मान्य केली. त्यानंतर आज्या भोसले याला दर महिन्याला 4 हजार रुपये व्याज देऊ लागले. 20 हजार रुपयांच्या बदल्यात 12 हजार रुपये पवार यांनी भोसलेला दिले. 5 ऑगस्ट रोजी भोसले कुटुंब पवार यांच्या घरी आले व व्याज व मुदतीचे 1 लाख 28 हजार रुपयांची मागणी त्यांनी केली. पैसे वेळच्यावेळी देत असल्याचे सांगताच त्यांनी पवार यांना शिवीगाळ व दमदाटी केली. आज्या भोसलेने पवार यांना त्यांच्या घरी आणून जिवे मारण्याची धमकी देत डांबून ठेवले.