दियाजिओ कंपनीने दिला दोन रुपयांनी कमी दर
बारामती : बारामती तालुक्यातील पिंपळी येथील दियाजिओ या कंपनीने यावर्षीचा वाईन द्राक्षाचा भाव निश्चित केला असून मागील वर्षीपेक्षा किलोला 2 रुपयांनी दर कमी देण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतील शेतकरी आणखीनच अडचणीत आला आहे. बारामती, इंदापूर परिसरात वाईनसाठी लागणारी द्राक्षबागा मोठ्या प्रमाणात आहे. या शेतकर्यांचा प्रपंच यावरच अवलंबून आहे. अशातच कंपनीने दर कमी दिल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
साडे दहा टन द्राक्ष खरेदीचा कंपनीचा निर्णय…
याचबरोबर कंपनीने एकरी फक्त साडे दहा टन द्राक्ष खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसाधारणत: सरासरी एकरी द्राक्षाचे उत्पन्नही 20 ते 23 टनापर्यंत मिळते. त्यामुळे उर्वरीत अकरा टन द्राक्ष बाजारात शेतकर्याला विकायची आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांकडे उरलेल्या द्राक्षांचे काय करायचे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यापुर्वीही कंपनीने असे निर्णय घेतल्याचे काही शेतकर्यांनी सांगितले. त्यावेळी येथील शेतकर्यांनी नाशिकच्या वाईन कंपन्यांना उर्वरित द्राक्षे पुरविली होती. परंतू, सध्याच्या परिस्थितीत दिंडोरी पिंपळगावपासून या भागातच मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा झाल्यामुळे येथील द्राक्षांची आवश्यकता भासत नाही.
शेतकरी संकटात
कंपनीच्या या दरवाढीतील घटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्यांत प्रति टनास सव्वादोन हजाराचा फटका बसणार आहे. यंदाच्या वर्षी औषध कंपन्यांनी देखील करार जवळपास 15 टक्क्यांनी वाढ केलेली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पन्नाचा खर्च वाढलेला आहे. अशातच या दरवाढीच्या कमी भावामुळे शेतकर्यांपुढे एक संकटच उभे राहिले आहे. त्यामुळे कंपनीने मागील वर्षीप्रमाणे द्राक्षास दर द्यावा, अशी मागणीही शेतकर्यांनी केली आहे.
आमच्याच द्राक्षाला दर कमी का?
मागील वर्षी कंपनीने प्रतिकिलो 22 रुपये दर दिलेला होता. यंदाच्यासाली कंपनीने किलोला 19 रुपये 75 पैसे प्रति असा दर जाहीर केलेला आहे. त्यामुळे शेतकर्यांना प्रति किलोला सव्वा दोन रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. मद्याचे बाजारातील दर गेल्या वर्षीपेक्षा जवळपास 20 टक्क्यांनी वाढले आहेत. मग आमच्याच द्राक्षाला दर कमी का? असाही प्रश्न शेतकर्यांनी केला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्यांकडे हे नवीनच संकट उभे राहिले आहे. मात्र, कंपनीच्या धोरणाविषयी शेतकरी जाहीरपणे बोलावयास तयार नाहीत. येथील राज्यकर्त्यांचे आणि कंपनीचे पूर्वीपासूनचे असलेले संबंध माहीत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी बोलण्यास तयार नाही.