पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व शेती प्रश्नाचे जाणकार नेते शरद पवार यांच्या बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील शेतकर्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून बुधवारी आत्महत्या केली. काशिनाथ सिधू हिवरकर (वय 60), असे या शेतकर्याचे नाव आहे.
हिवरकर यांच्यावर शिर्सुफळ विकास सोसायटीचा 1 लाख 75 हजार रुपयांच्या कर्जाचा बोजा होता. तसेच, आर्थिक अडचणींमुळे त्यांनी नातेवाईक, मित्रपरिवाराकडून उसने पैसे घेतले होते. हिवरकर यांच्या मुलाला सध्या नोकरी नाही. त्यातच त्यांची सून गेल्या पाच वर्षांपासून संधिवाताने आजारी आहे. सुनेच्या उपचारांचा खर्चही हिवरकर यांना झेपत नव्हता. या सर्व परिस्थितीमुळे हिवरकर आर्थिक अडचणीत सापडले होते. कर्जबाजारीपणाला कंटाळून हिवरकर यांनी बुधवारी पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बारामती येथील रुई ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
शेतकर्यांची थकीत कर्जे माफ करण्यात यावीत, तसेच शेतीपंपांची विजबिले माफ करावीत, या मागण्यांसाठी सध्या राष्ट्रवादी व काँग्रेस राज्यभरात संघर्ष यात्रा काढत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकर्यांच्या आत्महत्येचा मुद्दा चर्चेत आला असून, शेतकर्यांचे प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आले आहेत. अशातच बारामती तालुक्यातील शेतकर्यानेच आत्महत्या केल्याने खळबख उडाली आहे.