बारामतीत आपत्कालीन मदत कक्षाची स्थापना

0

बारामती । बारामती शहर आणि परिसरात दररोज मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याचे प्रमाण वाढत आहे. गृह सोसायट्या तसेच बैठ्या घरांत पाणी शिरणे, रस्त्यांमध्ये पाणी तुंबून वाहतूक कोंडी होणे तसेच घर कोसळणे, झाडे उन्मळून पडणे, वीजेच्या तारा तुटणे, तारांमध्ये शॉर्ट सर्कीट होणे, आगीची दुर्घटना, सांडपाणी गटर तसेच पर्जन्य जलवाहीन्या तुंबणे, दळण वळणाचा संपर्क तुटणे, रस्ता खचणे, जलप्रवाहात माणसे, जनावरे अडकणे अशा दुर्घटना घडण्याची शक्यता असते, बारामती नगरपरिषदेकडून 24 तास सेवा देणारे आपत्कालीन मदत कक्ष दोन ठिकाणी स्थापन केले आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली.

आपत्कालीन परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याकरीता निकम यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक बारामती तहसिल कार्यालात घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. तहसिलदार हनुमंत पाटील, ग्रामीण पोलिस निरीक्षक सुरेशसिंह गौड, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पाटील, तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जगताप, सहाय्यक गटविकास अधिकारी मिलींद मोरे आदींसह नगरपालिका व विविध विभागाचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. बारामती नगर परिषद मुख्य प्रशासकीय इमारतीतील नागरीक सुविधा केंद्र (दुरध्वनी क्र. 18002332302) तसेच पाटस रोड चौकातील नगरपरिषदेच्या मुख्य अग्निशमन केंद्रात (दुरध्वनी क्र. 02112-227201) हे कक्ष सुरू करण्यात आले आहेत.

अधिकार्‍यांनी समन्वय ठेवावा
आपत्ती व्यवस्थापन आराखडा सर्व विभागाने ताबडतोब सादर करावा. नगरपालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक इमारती निश्चित करून नागरीकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे. नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करून त्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पंचायत समितीने तालुक्यातील सर्व शाळांची तपासणी करून धोकादायक इमारतीमध्ये मुलांना बसवू नये. मुलांच्या सुरक्षिततेबाबत कोणताही हलगर्जीपणा करू नये, आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांनी समन्वय ठेवावा, असे तहसिलदार पाटील यांनी सांगितले.