बारामतीत गैरव्यवहाराचे उदंड पीक

0

बारामती । बारामतीतील प्रशासकीय भवन सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. दोनच दिवसात दोन गंभीर घटना घडल्याकारणाने बारामतीतील महसूल व भूमीअभिलेख प्रशासनाचा चेहरा नागरीकांसमोर उघड झाला आहे. मोजणी कार्यालयातील निमतीदार अमिन तडवी यास मोजणी झाल्यानंतर द्यावयाचे मिळकत प्रमाणपत्र व क तक्ता यासाठी दहा हजाराची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले. त्याचबरोबर बारामती महसूलचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी वाळूच्या प्रकरणात काट्यावधी रूपयाचे गैरव्यवहार केले.

त्याचप्रमाणे फेरफार बदलून सातबारा उतार्‍यावर नावे लावण्यासाठी माठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याने शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा ठपका तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभराव यांनी अहवालात ठेवल्याने महसूल प्रशासन चांगलेच चर्चेत आले आहे.

इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांचा जिल्ह्यात पारदर्शक कारभाराबाबत दबदबा आहे. वाळूमाफियांना नाकीनऊ करणारे तसेच कोणत्याही राजकारण्यांच्या दबावाला बळी न पडणारे अशी ख्याती असलेल्या इंदापूरच्या तहसिलदारांना निकम यांनी चांगलाच त्रास दिला होता. याबाबत निकम यांच्याकडे विचारणाही करण्यात आली होती. यावर निकम यांनी बोलण्याचे टाळले होते. इंदापूर व बारामती येथील वाळूमाफियांना निकम यांचा चांगलाच वरदहस्त होता. बारामती महसूल कार्यालयातील अंदागोंदी कारभारामुळे नागरिक चांगलेच त्रस्त आहेत.

तलाठ्याने अर्जाला दाखवली केराची टोपली
मेडद येथील गावकामगार तलाठी यांना एका अर्जाव्दारे काही माहिती मागीतलेली आहे मात्र मागील दिड महिन्यात कोणत्याही स्वरूपाची माहिती दिलेली नाही. या गावकामगार तलठ्यांनी सेवा हमी कायद्याचे कचर्‍याच्या टोपलीत टाकल्याचे लक्षात आले. अशी अनेक उदाहरणे बारामती महसूल कार्यालयातील सांगता येतील निकम यांच्यावर चौकशी अहवालात स्पष्टपणे ठपका ठेवण्यात आल्याने आता तरी बारामती तहसिल कार्यालयातील कारभार सुधारेल अशी सर्वसामान्य नागरीकांची अपेक्षा आहे.

हेमंत निकम यांच्यावर ठपका
गेल्या दोन वर्षात हेमंत निकम हे नागरीकांना दमदाटीची भाषा करीत असत यावरून नागरीकांमध्ये संतापाचे वातावरण होते. परंतू सर्वसामान्य नागरीकांची महसूल प्रशासनात अनेक प्रकारची कामे असल्याकारणाने नागरीक निकम यांची दमदाटीची भाषा ऐकून घेत असत. तरीही काही नागरीकांनी शासनाकडे याबाबतच्या तक्रारी केल्या होत्या. याविषयावर दैनिक जनशक्तिनेदेखील वाचा फोडली होती. परंतू आत्ता हा अहवालच बाहेर आल्याने निकम यांचे खरे स्वरूप उघड झाले आहे. बनावट पावत्यांव्दारे वाळूमाफियांकडून दंड वसूल करणे त्याचबरोबर दंडाची रक्कम माफ करणे किंवा कमी केल्याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांच्या चौकशी अहवालात हेमंत निकम यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.