बारामती । वीज वितरण विभागासंबंधी तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यासाठी महावितरण विभागाच्यावतीने बारामतीत ग्राहक संपर्क अभियान राबविण्यात आले. यास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अभियानात ग्राहकांच्या 50 तक्रारी तत्काळ निकाली काढण्यात आल्या.
नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व महावितरणच्या बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानास सुरुवात झाली. त्यांच्याहस्ते ग्राहकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. इरवाडकर यांनी या उपक्रमाच्या आयोजना मागची भूमिका मांडली. तावरे यांनी महावितरणच्या सेवेचे कौतुक करून उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
ग्राहकांचे प्रबोधन
या अभियानात वीज ग्राहकांकडून वीजबिल, वीजपुरवठा, नावात बदल, नावात दुरुस्ती, नवीन वीजजोडणी, मीटर बदलणे, वर्गवारी बदल व इतर तक्रारी दाखल झाल्या. यात बारामती शहर उपविभागात 33 तर बारामती ग्रामीण उपविभागात 17 तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला. या अभियानात उपस्थित ग्राहकांना महावितरण मोबाईल, ऑनलाईन वीज भरणा, मोबाईल क्रमांक नोंदणी, मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्र, टोल फ्री क्रमांक व इतर सेवांचीही प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. तसेच विद्युत अपघात टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबतही पोस्टर लावून व पुस्तिका देऊन ग्राहकांचे प्रबोधन करण्यात आले.
तक्रारींचा निपटारा
प्रथमच राबविण्यात आलेल्या या अभियानात जागेवरच तक्रारींचा निपटारा झाल्याचे समाधान ग्राहकांच्या चेहर्यावर झळकत होते. उपविभागीय अभियंता प्रकाश देवकाते, धनंजय गावडे, शाखा अभियंते डी. एस. जगदाळे, सुनील गौंड, सुनील महाडिक, सुनील राख, सचिन बनकर, प्रशांत गवसणे, दिग्विजय ठोंबरे, सुरज मेंढे, निखिल पाटील, राहुल लकडे, सुदर्शन लवांड, महेश कानतोडे, लेखा विभागाचे कर्मचारी व जनमित्रांनी अभियानाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.