पुणे – बारामतीतील ‘आमचा प्रभाग स्वच्छ प्रभाग’ असा टाहो सोशल मीडियावर फोडणाऱ्या नगरसेवकांनी साध्या स्वच्छतेकडे ही लक्ष दिले नाही, म्हणूनच मुलभूत सुविधापासून वंचित असलेल्या अण्णाभाऊ साठे नगर वासियांनी नगरपालिकेसमोर आज हलगीनाद आंदोलन केले. गेल्या वीस वर्षापासून येथील रहिवासी अंत्यत साध्या सोयीपासून वंचित आहेत. संपूर्ण शहरात नव्याने सुलभ स्वच्छतागृहे उभारली, पंरतू या मागासवर्गीय वस्तीतील स्वच्छतागृहाची केवळ डागडूजी करण्यात आली आहे.
समाज मंदिराची दुरवस्था
शहरातील ईतर भागात पक्के रस्ते बांधण्यात आले. परंतु या वस्तीतील रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याने पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. येथील समाज मंदिराच्या विकासासाठी अनेकदा निविदा निघाल्या. परंतू, ठेकेदारच मिळात नसल्याने आजही समाज मंदिराची दुरवस्था कायम आहे. येथील तरुण अनेक वर्षापासून व्यायाम शाळा, वाचनालयाची मागणी करत आहेत, मात्र या मागणींकडे नगरपालिका सतत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या परिसरात ठिकठिकाणी कचरा साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
जाणीवपुर्वक कानाडोळा
महानगरपालिकेकडे वाटचाल करणाऱ्या बारामती नगरपालिकेला ही बाब शोभणारी नाही. नगरपालिकेकडून मूलभूत सुविधा या भागात आल्या नाहीत, अनेकदा येथील सुशिक्षित तरुणांनी मूलभूत प्रश्नासंबंधी आवाज उठवूनही नगरपालिकेने त्याकडे जाणीवपुर्वक कानाडोळा केल्याची भावना येथील तरुणांची आहे.त्यामुळे आज या तरुणांनी हलगीनाद आंदोलन करुन आपल्या समस्याकडे पालिकेचे लक्ष वेधले.