बारामतीत लॉजच्या तळघरातील पाण्यात डास व आळ्या

0

बारामती । बारामती शहराच्या मध्यवर्ती भागात एका हॉटेल व लॉजच्याखाली गेल्या अनेक वर्षांपासून तळघरात पाणी साठलेले आहे. हे तळघरात 900 स्क्वे. फूट आकाराचे आहे. या तळघरात फार मोठ्या प्रमाणात आळ्या व डास आढळून आले. बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जगताप , आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे , रविंद्र सोनावणे यांनी येथील परिस्थिती पहिली असता धक्काच बसला. लॉज मालकास तातडीने नोटीस नगरपालिकेच्यावतीने पाठवण्यात आली असून याबाबत तातडीने पाण्याचा निचरा न केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असे नागरपालिकेच्यावतीने सांगण्यात आले.

लॉजमधील परिस्थिती पाहात असताना लॉज मालकाने आरोग्य निरीक्षकास दमदाटीची भाषा वापरली. बारामती शहरातील सिनेमा रोड या बसस्थानकापासून अगदी जवळच्या अंतरावर हे लॉज आहे. या भागात सातत्याने वर्दळ असते. या घटनेनंतर याच भागात व्यापारी इमारती असून बर्‍याच ठिकाणी तळघरात पाणी साचल्याने आढळून आले आहे या सर्व ठिकाणी नगरपालिकेचा आरोग्य विभाग प्रत्यक्ष पाहणी करून नोटीस पाठविणार असल्याचे नागरपालिकेच्यावतीने सांगण्यात आले.

बारामती शहर व परिसरात साठलेल्या पाण्यामुळे डासाची व अळ्यांची पैदास मोठया प्रमाणात होत आहे. शासनाचा आरोग्य विभाग व नगर पालिकेचा आरोग्य विभाग यांनी एकत्रित मिळून पाणी साठलेल्या ठिकाणांचा शोध घेण्याची मोहीम राबविली पाहिजे. अन्यथा डेंग्यूची फारच स्फोटक परिस्थिती बनण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थतीत खाजगी हॉस्पिटलमध्ये डेंग्यूचे रूग्ण बर्‍याच प्रमाणात दाखल आहेत. ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून कडक उपाय योजना करण्याची गरज आहे. असेही नागरीकांनी सांगितले.