बारामती (वसंत घुले) । बारामती नगरपालिकेत नगरसेवकांची दादागिरी चांगलीच वाढली आहे. गेल्या वर्षभरात चार नगरसेवकांनी दादागिरी केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तरीदेखिल दादांनी कुठलीच कारवाई न केल्यामुळे नगरसेवकांचे चांगलेच फावले आहे. बुधवारच्या घटनेने तर कहरच केला आहे. पतंगशहानगरमध्ये अतिक्रमण काढण्यावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि बांधकाम विभागाचे सभापती समीर उर्फ पप्पु चव्हाण व मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. चव्हाण यांच्या प्रश्नांची उत्तरे न देताच दालनाबाहेर पडणार्या मुख्याधिकार्यांना चव्हाण यांनी अपमानास्पद शब्द वापरले. त्यामुळे मुख्याधिकार्यांना रडू आवरले नाही. चव्हाण यांनी प्रशासनातील अनेक अधिकार्यांना दमबाजीची भाषा सुरूच ठेवल्यामुळे प्रशासनास काम कसे करायचे असा गंभीर प्रश्न पडला आहे.
अन् मुख्याधिकार्यांना आले रडू
नगरपालिकेने अतिक्रमण पाडण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र नगरपालिका पाडत असलेल्या एका पत्राशेडची जागा मालकीची असून त्याचा सातबारा आहे. तसेच शेड उभारण्यासाठी परवानगी मागीतली असल्याचे सांगत पत्राशेड काढणार असाल तर सर्वच अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम पाडण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केली. तर वरिष्ठांचे आदेश असल्याने हे अतिक्रमण असून ते काढले जाणार अशी भ्ाूमिका कडूसकर यांनी घेतली. कारवाई का थांबवली याचा जाब विचारण्यासाठी चव्हाण हे मुख्याधिकार्यांच्या दालनात आले होते. यावेळी उत्तर न देताच मुख्याधिकारी दालनाबाहेर निघाले. यावेळी चव्हाण यांनी मुख्याधिकार्यांना अपमानास्पद शब्द वापरले. त्यामुळे त्यांना रडू आवरता आले नाही. विशेष म्हणजे यावेळी काही नगरसेवक तेथे उपस्थित होते. मात्र त्यांच्यासमोर हा प्रकार घडत असतानाही त्यांनी चव्हाण यांना आडविण्याची साधी तसदीही घेतली नाही.
संतप्त झालेल्या अधिकारी, कर्मचार्यांनी आक्रमक पवित्रा घेत नगरपालिकेपुढे ठिय्या मांडत काम बंद आंदोलन केले. यानंतर मुख्याधिकार्यांनी सायंकाळी उशिरा सदरचा प्रकार हा गैरसमजातून झाल्याचे सांगून अधिकारी, कर्मचार्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व इतर नगरसेवकांनी अधिकारी, कर्मचार्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. यामुळे चांगलाच गंभीर पेच तयार झाला. याप्रकरणात मुख्याधिकार्यांनी अपमान होऊनही माघार घेतल्यामुळे शेपूट का घातले याची चांगलीच चर्चा रंगली. भक्कम पाठींबा असतानाही या सभापतीवर कोणतीही कारवाई न झाल्याने अधिकारी व कर्मचार्यांनी संताप व्यक्त केला.
नगरसेवकांमध्ये गटबाजी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकात दोन गट आहेत हे दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करताना सतत दिसत असतात. त्यामुळे प्रशासन आणि नगरसेवक यांच्यातला संघर्ष नगरपालिकेत सतत दिसून येतो. प्रशासनाने विकास कामे हाती घेतली की नगरसेवक हाणून पाडतात तर नगरसेवकांनी काही कामे हाती घेतल्यास गटबाजी करून नगरसेवकच कामे हानून पाडतात. हा भलताच प्रकार बारामती नगरपालिकेत सतत पाहावयास मिळतो. मुख्याधिकार्यांचा अपमान होत असताना इतर नगरसेवक मुकपणे पाहत होते.
विकासाला खीळ
गेल्या वर्षभरात नगरसेवकांनी दादागिरी केल्याच्या पाच-सहा घटना घडूनही अजित पवार कोणतीही निर्णायक भ्ाूमिका घेत नाहीत, हेही आश्चर्यकारक आहे. याचा अर्थ असा होतो की, दोन्ही नगरसेवकांच्या गटांनी झुंजत राहायचे आणि लोकप्रतिनिधींनी बघ्याची भ्ाूमिका घ्यायची, असा प्रकार असतो. यामुळे विकासकामे बाजूला राहून नगरसेवक, नगरसेवकांचे दोन गट, व प्रशासन यांच्यातली हाणामारी बघण्याची वेळ बारामतीकरांवर आली आहे. येणार्या काळात हा संघर्ष तीव्र होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. यात बळी कोणाचा जाणार अशी चर्चा जोरात रंगली आहे.