बारामतीत विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

0

बारामती । अनियमीत बसच्या सुविधेमुळे डोर्लेवाडी येथील विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. दररोजच्या या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी गुरुवारी बारामती-वालचंदनगर या रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले.

या मार्गावर बारामती आगाराच्या गाड्या जास्त धावतात. बारामती-वालचंदनगर, जांब, कुरवली, उध्दट, तावशी या मार्गावर दर आर्ध्या तासाला बसची सुविधा आहे. मात्र, बर्‍याचदा या मार्गावर एक-एक तासाने बस धावते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा बराच वेळ बस स्थानकावर वाया जातो. याच मार्गावर अकलूज आगाराच्या नातेपुते-बारामती ही बसदेखिल धावते. मात्र तीही उशिरा धावते. याबाबत बारामती व अकलूूज आगाराला सातत्याने लेखी स्वरुपात निवेदन देऊनही काहीही सुधारणा झालेली नाही. संध्याकाळी घरी जाताना बसमध्ये प्रचंड गर्दी असते. यात महिला व विद्यार्थिनींचे फारच हाल होतात. या विविध समस्यांनी त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करून आगार व्यवस्थापकाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दोन तास वाहतूक अडवून ठेवण्यात आली होती. यामुळे आगार व्यवस्थापक धुमाळ यांचे धाबे दणाणले होते. त्यांनी याबाबत सुधारणा करण्याचे आश्‍वासन दिले. येत्या आठवडाभरात या मार्गावरील फेर्‍या नियमितपणे व वेळेत सुरू होतील. विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आश्‍वासन त्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.