बारामती । बारामती एसटी आगारातील वाहक चालकांनी अघोषित संप केल्यामुळे शुक्रवारी प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. विशेषत: सकाळी आठपासूून बारामती आगारातून एकही बस सुटली नाही. बारामती आगारातून दररोज दिडशेच्यावर फेर्या होत असतात. या आगाराचे दररोजचे उत्पन्न जवळपास चाळीस लाखाच्यावर आहे. तसेच पंचवीस ते तीस हजार प्रवासी जा-ये करत असतात. अचानकपणे पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. बाहेरून येणार्या बसेस आगारामध्ये येत होत्या. मात्र, जाणार्या सर्व बस बंद होत्या. संपाची पूर्व कल्पना नसल्यामुळे प्रवासी बसस्थानकावर येत होते. मात्र बसेस बाहेर जात नसल्यामुळे बसस्थानकावर चांगलीच गर्दी जमली होती. लांब पल्ल्याचे प्रवासी बसस्थानकावर अडकून पडले होते. बसस्थानकावर बसण्यास जागाही नव्हती. विशेष म्हणजे सर्व संघटनांनी याबाबत मौन बाळगले होते.
भाड्याने बस घेऊन पैसे उकळतात
राज्यपरिवहन महामंडळ कर्मचार्यांविषयी तसेच त्यांच्या मागण्यांविषयी दुटप्पी भूमिका घेत आहेत. त्याचप्रमाणे प्रवाशांप्रतीसुध्दा महामंडळास फारसे काही देणे-घेणे उरलेले नाही. गेल्या चार वर्षात महामंडळाने एकही बस खरेदी केली नाही. याउलट खासगी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी मारल्या जात आहेत. महामंडळाकडील रकमेचा बांधकामावर विनाकारण खर्च केला जात आहे. वास्तविक पाहता प्रवाशांच्या सुखसोयींकरीता सर्वसामान्यांना परवडणार्या परिवर्तन बसेस खरेदी करून सुविधा देण्यात याव्यात. मात्र, याऐवजी शिवशाही नावाने बस भाडोत्री घेण्याकडे महामंडळाचा कल आहे, असे मत एका कर्मचार्याने जनशक्तिशी बोलताना व्यक्त केले.