बारामतीमध्ये माजी नगरसेवकावर खुनी हल्ला

0

बारामती : रविवार रात्री 9 वाजताच्या सुमारास अज्ञात तीन हल्लेखोरांनी बारामतीमधील माजी नगरसेवक अ‍ॅड. विजय लक्ष्मण गव्हाळे (55, रा. संघवी पार्क मार्केट यार्डसमोर, बारामती) यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले. गव्हाळे यांच्या पत्नीने आरडाओरड केल्याने मारेकरी पळून गेले. हा हल्ला कुणी व का केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गंभीर जखमी झालेले गव्हाळे यांना तातडीने बारामती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू होते.

जीवे मारण्याचा प्रयत्न
विजय गव्हाळे हे पत्नीसह गाडीतून (क्रमांक एमएच 42 के 5515) फेरफटका मारावयास गेले होते. इंदापूर रोडच्या मोतीबाग चौकातील कॉर्नरवर ते थांबले असताना मोटारसायकलवरून आलेल्या तरूणांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. गाडीच्या काचेतून डोकावून काय चालले आहे असे त्यांनी विचारले. यावेळी गव्हाळे हे गाडीतून खाली उतरले व त्यांनी या तरूणांना विचारले की तुम्ही विचारणारे कोण? यावरून एका तरूणाने दुसर्‍या दोन सहकार्‍यांना सांगितले, की याच्यावर वार करा. त्याबरोबर दुसर्‍या तरूणाने गव्हाळे यांच्या कपाळावर व डोक्याच्या मागील भागावर वार केले. तर तिसर्‍या आरोपीने त्यांच्या पोटावर सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

अद्याप कोणालाही अटक नाही
गव्हाळे यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी पळून गेले. जखमी आवस्थेत गव्हाळे यांना तातडीने बारामती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरूध्द 307 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय शामकांत जाधव हे घटनेचा तपास करत आहेत. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गव्हाळे यांनी बारामती नगरपालिकेत नगरसेवक असताना नागरिकांच्या समस्यांसाठी अनेकदा अंदोलने केली होती. नगरसेवक असतानाही ते नेहमी कार्यकर्त्यांच्या भूमिकेतच वावरत असत.