बारामती, इंदापूरमधील विद्यार्थिनी करणार आता गुप्तहेराचे काम

0

बारामती । शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी विद्यार्थीनींनीच पुढाकार घेतला आहे. पोलिसांच्या निर्भया पथकात आता बारामती, इंदापूरमधील विद्यार्थिनी गुप्तहेराचे काम करणार आहेत. त्यासाठी 40 मुलींची निर्भया सखी म्हणून निवड करण्यात आली आहे. या सखी विद्यार्थिनी आणि पोलिसांमधील दुवा ठरणार आहेत. छेडछाडीसारखे प्रकार रोखण्यासाठी त्या पोलिसांशी समन्वय साधून काम करणार आहेत.

महाविद्यालयांमध्ये तक्रारपेटी
मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, सक्षम बनविणे, पुरुषांमध्ये मुली, स्त्रियांबाबत आदराचे स्थान निर्माण करणे, मुलींना निर्भय बनविणे, मोबाईलसह सोशल मीडियावरून होणारा त्रास, छेडछाड, सायबर क्राईम रोखणे आदी हेतूने विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून निर्भया पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. बारामती, इंदापूर शहर तालुका निर्भया पथकासाठी पोलिस उपनिरीक्षक वर्षा जगदाळे, पोलिस नाईक अमृता भोईटे कार्यरत आहेत. सध्या निर्भया पथकाच्या वतीने दोन्ही तालुक्यांतील 20 महाविद्यालयांमध्ये तक्रार पेटी बसविण्यात आली आहे. ही पेटी बसवितानाच महाविद्यालयातील युवक-युवतींशी संवाद साधला जात आहे.

पोलिसांचे पाठबळ
छेडछाड, पाठलाग आदी त्रास देण्याचे प्रकार होत असल्यास निर्भया पथकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थिनींना निर्भया पथकातील अधिकारी, कर्मचार्‍यांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. विद्यार्थिनींनी निर्भयपणे शिक्षण घ्यावे, यासाठी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील मुलींना पोलिसांचे पाठबळ मिळणार आहे. तसेच छेडछाडीसारख्या प्रकारांना आळा बसणार आहे.

15 दिवसांनी उघडणार तक्रारपेटी
निर्भया सखी म्हणून एका महाविद्यालयातून प्रत्येकी दोन विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थिनींना पोलिसांच्या वतीने ओळखपत्र देण्यात येणार आहे. या निर्भया सखी महाविद्यालयातील मुलींच्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचवणार आहेत. तक्रार करणार्‍या मुली, निर्भया सखींच्या नावाबाबत गुप्तता पाळली जाणार आहे. तसेच निर्भया पथक 15 दिवस ते 1 महिन्यादरम्यान तक्रारपेटी उघडतील़

…तर होणार गुन्हा दाखल
मुलींकडे एकटक पाहणे, पाठलाग करणे, गाणे म्हणणे, मोबाईलवर मिस कॉल देणे, कॉल करणे चुकीचे आहे. याबाबत मुलींनी तक्रार केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. महाविद्यालयातील युवकांनी अज्ञानातून, चुकीच्या संगतीने मुलींची छेड काढल्यास होणारी पोलिस कारवाई, त्याचे मुलाच्या भवितव्यावर होणारे गंभीर परिणाम आदींची माहिती दिली जात आहे.