जयपाटील यांचा राजीनाम : विविध विषय समितीच्या सभापतींची निवड
बारामती । बारामती नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जयपाटील यांनी राजीनाम दिला आहे. नगरपालिकेच्या राजकीय समीकरणांप्रमाणे ठरलेल्या वेळेत राजीनाम देणे त्यांना भाग पडले आहे. बारामती नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतीच्या निवडीसाठी आयोजित केलेल्या विशेष सभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची सभापतीपदी निवड करण्यात आली. त्याचवेळी त्यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी कोणाच्या गळ्यात माळ पडणार याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत. पाटील यांचा राजीनामाही या सभेत मंजूर करण्यात आला.
पक्षश्रेष्ठींच्या सुचनेनुसार राजीनामा
पाटील यांनी पक्षश्रेष्ठींच्या सुचनेनुसार उपनगराध्यक्षपदाचा आपला राजीनाम दिला. त्यांनी उपनगराध्यक्ष पदावर एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला आहे. मागील महिन्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सह्यांची मोहीम व लॉबिंगप्रकरणी नगरसेवकांना जाहीर सभेत सुनावले होते. याची बारामती परिसरात चांगलीच चर्चा झाली होती. त्यामुळे कोणाचा बळी जाणार व बारामती नगरपालिकेच्या एकहाती सत्तेच्या राजकारणाची परिणीती काय असू शकते. याविषयीच बोलले जात होते. याचा परिणाम या सभेत दिसून आला.
बालकल्याणच्या सभापतीपदी चौधर
या सभेत नगरपालिकेच्या महिला विभाग व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सुरेखा चौधर, सार्वजनिक आरोग्य स्वच्छता समितीच्या सभापती पदी तरंन्नुम सय्यद, सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी समीर चव्हाण, पाणीपुरवठा समिती सभापती पदी विणा बागल तर शिक्षणसभापती पदी अभिजीत जाधव यांची निवड करण्यात आली होती. बारामती नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची बहुमताने एकहाती सत्ता असल्यामुळे सर्व सभापतींची निवड बिनविरोध झाली. परंतु उपाध्यक्षपद अजूनही रिक्त आहे. या पदी कोणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.