बारामती । बारामती तालुका क्रीडा संकुल विशेष निधी अंतर्गत धावणमार्ग दुरुस्ती, ड्रेनेज व्यवस्था, संपूर्ण मैदानावर पाण्याची व्यवस्था करणे, प्रत्येक खेळाच्या मैदानावर स्वतंत्र नळजोड घेणे, मैदानावर खेळाडू व नागरीक यांच्यासाठी पाण्याची टाकी व नळ कनेक्शन काढणे आदी कामे प्रस्तावित असल्याचे तालुका क्रीडा अधिकारी राजेश बागुल यांनी सांगितले.
बारामती तालुका क्रीडा समितीची आढावा बैठक संकुल समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बागुल बोलत होते. समिती सदस्य मुख्याधिकारी मंगेश चितळे, बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विश्वास ओव्हाळ, माळेगाव ग्रामपंचायतीचे निमंत्रित सदस्य बापू तावरे, ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक सी. बी. बेरड याप्रसंगी बोलत होते.
ग्रामीण भागात क्रिडा खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा. येथील उद्योन्मुख खेळाडुंना क्रिडा प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीकोनातून तालुका क्रिडा संकुले विकसीत करण्यात येत आहेत. संकुलाची देखभाल दुरुस्ती, विशेष निधी अंतर्गत करावयाची प्रस्तावित कामे याबाबत समिती सदस्यांच्या सूचना विचारात घेऊन कारवाई करावी, असे हनुमंत पाटील यांनी सांगितले. तालुका क्रिडा संकुलाच्या सद्यस्थिती व कामकाजाबाबत तालुका क्रीडा अधिकार्यांकडून त्यांनी विस्तृत माहिती घेतली. दरम्यान, बँडमिटंन हॉलमध्ये पुरेशी प्रकाशाची व्यवस्था नसल्याने सरावासाठी येणारे खेळाडू पुरेशा प्रकाश व्यवस्थेची मागणी करत असल्याचे समिती सदस्यांनी सांगितले. संकुलात खेळांडूकरीता वसतीगृह तसेच प्रेक्षागृह तयार करण्याविषयीची मागणी त्यांनी समितीसमोर केली.