60 लाखांची तरतूद : सर्वसाधारण सभेत गोंधळ
बारामती : बारामती नगरपरिषदेतील कर्मचार्यांना दिवाळीकरीता 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे ठरले होते. नगरपालिकेने त्यासाठी 60 लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी कर्मचार्यांनी केली आहे. यावरून नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ उडाला होता. विरोधी पक्षाचे नगरसेवक सुनिल सस्ते, सत्ताधारी नगरसेवक गणेश सोनवणे, नवनाथ भल्लाळ यांनी 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान दिलेच पाहिजे, अशी जोरदार मागणी केली. नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांनी नकार दिला. 20 हजार रुपये बोनस देऊनदेखील नगरपालिकेकडे 14 लाख रुपये शिल्लक राहतात मग नगरपालिका याबाबत ठाम निर्णय का घेऊ शकत नाही, असा पवित्रा नगरसेवकांनी घेतला होता. यामुळे नगराध्यक्षांनी माघार घेत 20 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली.
घरकुल योजना राबविणार
सर्वसाधारण सभेत दहा विषय मंजूरीसाठी ठेवण्यात आले होते. सर्व विषय चर्चेअंती मंजूर करण्यात आले. नगरपरिषदेच्या नगररचना योजना क्र. 1 मधील अंतिम भूखंड क्र. 271 या ठिकाणी रहिवाशांकरीता घरकुल योजना राबविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यामध्ये 96 कुटुंबांना घरकुल मिळणार आहे. नगरपालिकेच्या विविध प्रभागात दहा ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्यांची अंदाजपत्रके व आराखडे पॅनलवरील तांत्रिक सल्लागार किकले यांना मंजुरीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र सल्लागार फी म्हणून 3 टक्क्यांऐवजी 2 टक्के देण्याचे ठरले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत बारामती शहर कचरामुक्त व हागणदारीमुक्त करण्यासाठी शहराला तारांकित मानांकन देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.