बारामती नगरपरिषदेला 78 तक्रारींचे निवेदन

0

बारामती : बारामतीचे संपूर्ण राजकारण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावरच चालते. याचाच धागा पकडत बारामतीतील भाजप कार्यकर्ते सुरेंद्र जेवरे यांनी खा. शरद पवार यांच्या 78 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत शहरातील 78 तक्रारींचे भले मोठे निवेदन नगरपरिषदेला देत या तक्रारींचे निराकरण करुन खा. पवार यांना वाढदिवसाची भेट देण्याची मागणी केली आहे. यात अनेक नागरी प्रश्‍न मार्गी लावण्याच्या मागण्यांसह नगरपरिषदेतील भ्रष्टाचारांच्या प्रकरणांचाही समावेश असून त्यावर कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

अशा आहेत मागण्या…

तब्ब्ल 20 पानांच्या या निवेदनात, शहरातील नागरी समस्यांबरोबरच सिध्देश्‍वर गल्ली येथी उद्यान, टिसी कॉलेजलगतचे प्रस्तावित उद्यान, मुस्लिीम समाज दफनभूमी, बहुउद्देशीय सभागृह, विविध भागातील पाणी, भूयारी गटारे, अस्वच्छता, रस्ते, वाढीव घरपट्टी, सार्वजनिक शौचालय दुरावस्था, आरोग्य व्यवस्था अशा विविध प्रश्‍नांकडे लक्ष वेधले आहे. तसेच शहर पोलिस ठाण्यासमोरील उद्योगभवन, संत जगनाडे महाराज उद्योगभवनातील गाळयांचे लिलाव करुन नगरपरिषदेने उत्पन्न सुरु करावे, अनेक ठिकाणी गरज नसताना टाकलेले आरक्षण रद्द करुन संबंधित जागा परत कराव्यात, गणेश मार्केटमधील वाहनतळ सुरु करावे, घरकुल योजनेचा गरजूंना लाभ द्यावा, अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशा तब्बल 78 मागण्या जेवरे यांनी केल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची गोची…

एकूणच जेवरे यांनी शरद पवार यांच्या 78व्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरपरिषदेशी संबंधित 78 तक्रारींचा लेटर बाँम्ब टाकून नगरपरिषद वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यातच त्यांनी या समस्यांचे निराकरण करुन शरद पवार यांना वाढदिवसाची भेट देण्याची मागणी करत राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची गोची केली आहे. त्यामुळे आता जेवरे यांच्या पत्रावर बारामती नगरपरिषद काय कार्यवाही करणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे जेवरे यांनी दिलेल्या पत्रात बारामती नगरपरिषदेच्या गाजलेल्या डुक्कर घोटाळा प्रकरण, स्वच्छ सर्वेक्षणातील बोगस डाटा एन्ट्री ऑपरेटर बिल प्रकरण, नियमबाह्य निविदा प्रक्रिया, बांधकाम परवाने, पथारी कर वसुलीतील घोटाळा आदी प्रकरणांची चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.