बारामती (वसंत घुले)। बारामती शहराच्या नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे यांची बारामती नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी शहरात नगरपालिकेच्यावतीने बससेवा सुरू करण्यात येईल, असे सांगितले होते. विशेष म्हणजे यासाठी 50 लाखांचा निधीही नगरपालिकेकडे उपलब्ध आहे. तरीही याबाबत कोणतेही ठोस पाऊल नगरपालिकेने उचललेले नाही. याउलट नगरपालिकेवर विविध प्रकारचे गैरव्यवहाराचे आरोप होताना दिसतात. यातच नगरपालिका प्रशासन व पदाधिकारी यांचा वेळ जात असल्याचे दिसून येते. परिणामी पलिकेची बससेवा रखडली आहे.
बंद पडणार्या एसटींची संख्या जास्त
बारामती एस. टी. आगार हा राज्यात सर्वांत जास्त उत्पन्न देणारा आगार ओळखला जातो. पण गेल्या दिड वर्षापासून या आगाराला नवीन गाड्याच पुरविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे जुन्या व बाद झालेल्या गाड्यांवरच या आगाराचा कारभार चालू आहे. मोडकळीस आलेल्या, खडाखडा आवाज करणार्या, रस्त्यात मध्येच बंद पडणार्या बसची संख्या जास्त आहे. बारामती आगारास नव्या शंभर गाड्यांची आवश्यकता आहे. मात्र राज्याच्या परिवहन महामंडळाने नवीन गाड्यांची खरेदीच बंद केली आहे. त्यामुळे नव्या गाड्या येणे बंद झाले आहे.
60 हजार प्रवाशांसाठी एसटीच्या फक्त 110 बस
बारामती एस.टी. आगारात 110 बसगाड्या असून प्रवासी संख्या मात्र 60 हजारपेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. आगारात प्रवाशांच्या सेवेसाठी हिरव्या रंगाच्या मिनीबस आल्या खर्या, पण या बस वापरलेल्या, जुन्या व कालबाह्य झालेल्या आहेत. या बसच्या दुरूस्तीसाठी प्रशिक्षीत कामगारवर्ग नाही. त्यामुळे बसची देखभाल चांगल्या दर्जाची होत नाही. त्यामुळे या बसमधून फार मोठया प्रमाणात धूर सोडला जात असून प्रदूषण वाढत आहे. याचाच परिणाम प्रवासी रिक्षा व बेकायदेशीर वाहनाकडे वळतात.
प्रवाशांचा द्राविडी प्राणायाम
राज्य परिवहन महामंडळाच्या बदलणार्या निर्णयाचा फटका प्रवाशांना बसत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करून जिल्हा स्तरावरती नियोजन केले जावे हा फतवा अत्यंत त्रासदायक असून अधिकारी हैराण झाले आहेत. श्रीगोंदा-कोल्हापूर ही गाडी बंद करण्यात येऊन सदरची गाडी श्रीगोंदा-बारामती करण्यात आली. व तीही दोनच दिवसात बंद करण्यात आली. श्रीगोंद्याच्या प्रवाशांना कोल्हापूरला जावयाचे असल्यास प्रथम बारामतीला यायचे बारामतीहून सातारला जायचे व सातार्यावरून कोल्हापूरला जायचे म्हणजे तीन बस बदलायच्या हा द्राविडी प्राणायाम सुरू आहे. प्रवाशांना याची कुठलीही कल्पना न देता अत्यंत गोपनिय पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे काम सुरू आहे.
एसटीवर ताण
शहराची हद्दवाढ करताना वाहतूक व्यवस्थेचा विचार केला गेला नसल्याचे दिसून येते. शहराबाहेरून व आसपासच्या परिसरातून 22 हजाराच्यावर विद्यार्थी दररोज बारामतीत ये-जा करतात. तसेच नोकरी आणि व्यवसायासाठी येणार्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे एस. टी. वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे.
प्रवासी संतप्त
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने बारामतीकरांचे हाल सुरू आहेत. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घ्यावा आणि स्वत:ची वाहतूक व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी नागरिकांधून होत होती. नगराध्यक्ष तावरे यांनी त्यासाठी पुढाकार घेण्याचे जाहीर केले. परंतु ते हवेतच विरले. अद्यापर्यंत कोणत्याही हालचाली नगरपालिकेने सुरू केल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.