बारामती नगरपालिकेच्या स्वच्छतेबाबत केवळ घोषणाच

0

‘स्वच्छ सर्वेक्षण’त बाजी मारण्याची तयारी; प्रभागातील अस्वच्छतेकडे दुर्लक्ष

बारामती : बारामती नगरपालिका प्रशासनाने यंदा स्वच्छ सर्वेक्षणात यश मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2019साठी आम्ही तयार आहोत’ असे फलकही झळकले आहेत. मात्र प्रभाग क्रमांक 8 मधील महादेव मळातील नागरिकांनी स्वच्छता राखण्यात येत नसल्याची तक्रार केली आहे. परिसराकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याने कोणी नगरसेवक देता का नगरसेवक? अशी खोचक टीका करत अस्वच्छतेमुळे होणार्‍या गैरसोयींची तक्रार मांडली आहे. यामुळे स्वच्छतेच्याबाबत प्रशासन केवळ घोषणाच करत असल्याचे चित्र आहे.

पाटस रस्त्यालगत महादेव मळा वस्ती आहे. साधारण 400 लोकांची वस्ती येथे आहे. येथील परिसर नियमितपणे झाडला जात नाही, कचर्‍याची गाडी 8 दिवसातून एकदाच येते. जलवाहिनीला गळती आहे. रस्त्यावर कचरा टाकल्याने येथे कचराकुंडीचे स्वरुप आले आहे. त्याबद्दल नागरिकांनी नगरपालिकेकडे पाठपुरावा केला, पण त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. गेली 10 वर्षे येथील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम झालेले नाही, हा रस्ता पूर्ण उखडल्याचे येथील महिलांनी सांगितले.

रस्त्याचे काम मंजूर आहे, पण हे काम का होत नाही, कुठे अडते, असा प्रतिप्रश्‍न नगराध्यक्षांनीच विचारल्याचे महिलंनी याबाबत सांगितले. विद्यमान नगरसेवक हे या प्रभागातलेच रहिवासी आहेत. त्यांचा रोजचा येण्या-जाण्याचा रस्ता आहे, तरी या समस्यांकडे ते लक्ष देत नाहीत, असा तक्रारीचा सूर आळवला. नगरपालिकेने रस्त्यावर घाण केल्यास आर्थिक दंड करण्याचा ठराव मंजूर केला आहे, मात्र येथे राहणार्‍या लोकांसाठी स्वच्छतागृहाची सोय करण्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्‍न विचारण्यात येत आहे. प्लॉटमालकांना पालिकेने याबाबत समज देणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याचे नळ नादुरुस्त असल्याने पाणीगळती होते. पाणी रस्त्यावर वाहते. नगरपालिकेला याकडेही लक्ष द्यायला वेळ नाही.

नगरपालिकेवर नेणार महिलांचा मोर्चा

येथील कचरा आणि घाणीमुळे सापाचे प्रमाण वाढले आहे. या भागातील मोकळे भूखंड परप्रांतियांना भाड्याने दिले आहेत. त्यांनी येथे पुठ्ठ्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. रस्त्याच्या कडेला पुठ्ठ्यांचे मोठे ढीग रचले आहेत. हे लोक बहुसंख्येने असून त्यांचे वास्तव्य येथेच आहे. मोकळी जागा बघून ते कचरा टाकतात. काही वेळा कचरा पेटवल्याने वस्तीत धूर पसरतो. तसेच त्यांनाही स्वच्छतागृहांची सोय नसल्याने अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. लोकांच्या घाणीचा त्रास आम्हाला का? असा संतप्त सवाल स्नेहा भापकर, सुवर्णा कुर्‍हाडे, हाफिया पठाण, केशर ठोंबरे, शकुंतला परकाळे या महिलांनी केला आहे. सगळ्या मागण्या 8 दिवसांत पूर्ण न झाल्यास नगरपालिकेवर महिलांचा मोर्चा नेण्याचा इशारा भापकर यांनी दिला.