बारामती (वसंत घुले) । बारामती नगरपरिषदेतील गटबाजीबद्दल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत नाराजी व्यक्त करून नगरसेवकांना दम दिला होता. परंतु त्यानंतरही नगरपालिकेत गटबाजी सुरूच असल्याचे दिसून येते.
मागील काही महिन्यात उपनगराध्यक्ष बदलण्यासाठी दहा नगरसेवकांनी सह्यांची मोहीम राबविली होती. याचाच अर्थ असा होतो की, नगरपालिकेत काहीतरी गडबड गोंधळ सुरू आहे. विरोधी तीन नगरसेवकांना सत्तारूढ पक्षाचे नगरसेवक जुमानत नाहीत. एवढेच नव्हे तर नागरीकांचे प्रश्न जेव्हा विरोधी नगरसेवक उपस्थित करतात तेव्हा ओरडण्यापुरते बळ त्यांना आलेले असते. एरव्ही मात्र, मान घेऊन नगरसेवक बसलेले असतात. नगरपरिषदेत कुरघोडीचे राजकारण हा काही नवीन विषय नाही.
नगरपालिकेत दिवसभर कोण येते, कोण जाते, कोण कोठे बसते, कोण काय करते, यावर निश्चितपणे लक्ष ठेवण्याची गरज भासत नाही. असेच नगरपालिकेचे राजकारण आहे. केवळ सहानुभूती मिळवायची या उद्देशाने या मार्गाचा अवलंब करायचाच ठरवला तर बारामतीकरांना नगरपालिकेच्या कारभाराची चांगलीच जाणीव आहे. संपूर्ण बारामतीच्या विकासाचा आलेख तयार केला तर तयार होणारे चित्र काय असेल याची कल्पनाच न केलेली बरी. श्री गणेश मार्केट मंडईतल्या ओटेधारकांची चाललेली परवड भयावह आहे. मंडईच्या उद्घाटनावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर सभेत सांगितले होते, मंडईची कोणतीही तक्रार येता कामा नये. तसेच जुन्या ओटेधारकांना न्याय मिळेल, असे पहावे. याचवेळी अजित पवार यांनी देखील असे सांगितले होते की, मंडईच्या प्रश्नातून वाद निर्माण होऊ नये यासाठी नगरपालिका प्रशासन व पदाधिकारी यांनी स्वत: लक्ष देऊन मंडई उभारावी. पण आज चार महिने झाले, मंडईच्या व्यवस्थापनासाठी व ओटेधारकांवरील अन्याय दूर करण्यासाठी पदाधिकारी व प्रशासन यांना वेळ मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.
बारामतीकरांचे असंख्य प्रश्न अपूर्ण अवस्थेत असून या प्रश्नाकडे सहानुभूतीपूर्वक पाहिल्यास सर्वांना समान न्याय मिळेल, अशी थोडी तरी अंधूकशी आशा उरतेच याचे महत्त्वाचे कारण रिंगरोडचे खड्डेयुक्त रस्ते, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार फेरीवाल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी करणे, नगरपालिकेच्या मालकीच्या इमारतींची चाललेली दुर्दशा आणि याकडे होत असलेले दुर्लक्ष, पालिकेची बेकायदेशीर कामे अशा असंख्य प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. परंतु यासाठी नगरसेवकांना वेळ नसल्याचे दिसून येते. त्यामुळे शहराच्या विकासाचे तीनतेरा वाजले आहेत.