बारामती नगरपालिकेत ‘झिरो पेंडन्सी’ सुरु

0

पुणे । लोकाभिमुख व गतीमान प्रशासन देण्यासाठी बारामती नगरपालिका प्रशासनाने ‘झिरो पेंडन्सी’ अभियानाची अंमलबजावणी सुरू केली आहे. सुट्टीच्या दिवशी विभाग प्रमुखांसह इतर कर्मचारी ‘झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल’ कामकाजात व्यस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.पहिल्या टप्प्यात नगरपालिकेच्या सतरा विभागातील प्रलंबित प्रकरणांची संख्या निश्‍चित करून त्या सर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. यामध्ये रुई, जळोची, तांदुळवाडी, बारामती ग्रामीण या क्षेत्रीय कार्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये सिक्स बंडल पध्दत, लिपीक दप्तरातील नोंदवही अद्ययावत करणे, ए.बी.सी.व डी. पध्दतीची यादी तयार करणे, अभिलेख कक्ष आदर्श करण्याकडे लक्ष दिले असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली.

प्रकरणांचा निपटारा
‘झिरो पेंडन्सी’मुळे नागरिकांना लोकाभिमुख प्रशासन देणे शक्य होणार आहे. प्रशासनाला नागरिकांच्या सर्व प्रश्‍नाचा निपटारा करणे, विकासकामांना गती मिळून जनतेच्या कल्याणासाठी शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजना राबवणे सहज शक्य होणार आहे. वर्षानुवर्षे नागरिकांची कोणतीही प्रकरणे प्रलंबित असल्यास, ती तातडीने मार्गी लावली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी दिली आहे.

काम प्रगतीपथावर
झिरो पेंडन्सीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाने काम सुरू आहे. यामधूनच लोकाभिमुख प्रशासन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी नगरपालिकास्तरावर सर्व अधिकारी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोणत्याही विभागाचा अभिलेख कक्ष हा अत्यंत महत्वाचा असल्याने स्वच्छ आणि अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या बाबतीत जनतेच्या मनात सकारात्मकता वाढेल, असे काम करण्याचा संकल्प असल्याचे मुख्याधिकारी मंगेश चितळे म्हणाले. अधिकारी, कर्मचार्‍यांची मानसिकता बदलण्यात यशस्वी झाल्यामुळेच बारामती नगरपालिकेमध्ये ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ उपक्रमाचे काम सध्या प्रगतीपथावर असल्याचे चितळे यांनी सांगितले.