बारामती नगरपालिकेने लिपिकाला केले निलंबित

0

बारामती । बारामती नगरपालिकेच्या हद्दीतील डुक्कर पकडण्याचा दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्यासाठी विलंब केल्याने लिपिक प्रशांत वायसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

बारामती शहरातील मोकाट 580 डुक्करे पकडल्याचा दावा बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केला होता. मात्र, यावर विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, नगरसेवक विष्णुपंत चौधर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. नगरपालिका जिल्हा प्रशासन अधिकाजयांनी दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. नगरपालिकेचे लिपिक प्रशांत वायसे यांना या प्रकरणातील अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी दिले होते. मात्र, त्यांनी अहवाल सादर केला नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांना अहवाल पाठवण्यास दिरंगाई झाली.

बारामती नगरपालिकेची गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येत असतानाच ही कारवाई धक्कादायक ठरणारी आहे. यामुळे नगरपालिकेतील काही अधिकारी दिर्घमुदतीच्या रजेवर गेलेले आहेत. तर काहीजण दिर्घ रजेवर जाण्याच्या तयारीत आहेत, असे खात्रीपूर्वक समजते. निवडणूक व्हिडीओ प्रकराचीही चौकशी सुरू आहे. त्याचप्रमाणे शाळा क्र.1 ते 8 मधील विद्यार्थ्यांना गेली दोन वर्षे गणवेश वाटप झाले नसल्याचे प्रकरण ही तापत आहे.

आदेशाला केराची टोपली
डुक्कर प्रकरणातील बिल काढताना लिपिक म्हणून वायसे यांनी देयके तयार करून सह्या केल्या. त्यानंतर आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे यांच्या सह्या असल्यामुळे तत्कालीन मुख्याधिकार्‍यांच्या सहीने बिल काढले होते. वायसे यांनी मुख्याधिकार्‍यांचे आदेश मानले नाहीत, म्हणून मुख्याधिकार्‍यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.