बारामती । बारामती नगरपालिकेशेजारीच राज्यसरकारची जागा आहे. या जागेचा सर्व्हे क्रमांक 613 असून नगरपालिकेचा सर्व्हे क्रमांक हा 612 आहे. सन 1919 ते 1969 अशी 50 वर्षांकरीता भाडेपट्ट्याच्या कराराने सर्व्हे क्रमांक 613 मधील जागा मिळाली होती. करार संपल्यानंतर आज 48 वर्ष सदरची जागा विनापरवानगी नगरपालिका वापरत आहे. विशेष बाब म्हणजे या जागेत नगरपालिकेने 70 गाळे बांधले. 48 वर्षे या गाळ्यांचे भाडे वसूल केले. हे सत्तर गाळे बांधून भाड्याने दिले. मात्र नगरपालिका प्रशासनास यासाठी राज्यसरकारची परवानगी घ्यावी लागली नाही हे आश्चर्यजनक आहे. भाडेपट्टयाने घेतलेल्या जागेचे भाडे 1 रूपाया 68 आणे एवढे होते.
न्यायालयात याचिका दाखल करणार
नगरपालिकेची जागा व राज्यसरकारची जागा याच्या मध्यातही तीन मीटर जागा नियमानुसार सोडण्याची गरज आहे. पण हाही नियम नगरपालिकेने तोडला आहे. अक्षरश: अत्यंत खेटूनच बांधकाम केलेले आहे. नगरपालिकेच्या या चुकीमुळे दुकानदारांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व गोष्टींमुळे 70 दुकानदार व्यवसायापासून मुकले आहेत. आता नगरपालिका गाळे बांधल्यापासून आत्तापर्यंत जेवढे भाडे घेतले आहे. त्याचा हिशोब देण्यास बाधील राहणार आहे. या सर्व प्रकरणाची बाजू तपासली असता आता नगरपालिकेने दुकानदारांना वार्यावर सोडले आहे. माहितीच्या अधिकारात याबाबतची माहिती घेतली असता नगरपालिकेने सरळसरळ ही जागा आमची नाही असे म्हटले असून आम्ही हे बांधकाम विनापरवानगीने करीत असून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही असे उत्तर देण्यात आले आहे. या प्रकाराबद्दल भाजपा नेते प्रशांतनाना सातव हे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
प्रशासन, पदाधिकार्यांची उडवाउडवीची उत्तरे
नगरपालिका सर्वच नियम तोडून कारभार करीत आहेत. नगरपालिकेचे अनेक बेकायदेशिर प्रकरणे बाहेर येत असून प्रशासन व पदाधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. बारामती शहरातील नागरिकांना नगरपालिकेच्या अशा कारभाराचा चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे यापुढील काळात नगरपालिकेची सर्व प्रकरणे जनतेसमोर आम्ही मांडणार आहोत. विशेष म्हणजे एका एका प्रकरणाचे सविस्तर निवेदन करून ते नागरिकांपर्यंत पोहोचविणार आहोत तसेच सदर प्रकरणाचे पुरावे म्हणून सोबत तीन चार पुरावे देणार आहोत.
– प्रशांत सातव, भाजप नेते
महामार्गाचेही नियम धाब्यावर बसविले
याठिकाणची इमारत पाडून रस्ता रूंदीकरणाचा नगरपालिकेचा प्रयत्न होता. यासाठी रस्त्यानजीकचे दुकान पाडण्यात आले. व मागील बाजूच्या दुकानांची डागडुजी करून पुन्हा भाड्याने देण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न होता. विशेष म्हणजे या जागेच्या समोरून राज्य महामार्ग क्रमांक 54 जात आहे. हा राज्यमार्गही विस्तारीत असून पाटस ते इंदापूर असून हाच मार्ग पाटस फलटण सातारा असाही आहे. वास्तविक पाहता या जागेसाठी मध्यापासून 35 मीटर जागा सोडणे आवश्यक आहे. राज्यमहामार्गाच्या नियमानुसार हे सर्व नियम नगरपालिकेने धाब्यावर बसविले आहेत. राज्यमहामार्गाच्या भाषेत बोळच म्हणावी लागेल. नगरपालिकेला याचे काहीही घेणेदेणे नाही.