बारामती : बारामती-पुणे या मार्गावरील शिवशाही बसेसची संख्या कमी करून राज्यपरिवहन महामार्ग महामंडळाच्या बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बारामती शाखेने बारामतीच्या आगार व्यवस्थापकांकडे केली आहे. शिवशाही या बसेस खासगी मालकीच्या असून त्याचे ड्रायव्हार अप्रशिक्षित आहेत. तसेच शिवशाही या बसेस रिकाम्या गेल्या तरी संपूर्णत: म्हणजे चाळीस प्रवाशांचे भाडे शिवशाहीच्या मालकांना द्यावे लागतील याचाच अर्थ असा की, महामंडळाकडे जमा झालेला सर्वसामान्यांचा पैसा हा खासगी मालकांना दिला जात आहे. ही लूट थांबवावी, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.
बारामती आगाराने परिवर्तन या बसेस कमी करून 36 फेर्या या शिवशाहीच्या केल्या आहेत. प्रतिप्रवासी 200 रुपये हा दर शिवशाहीचा असून निमआराम बसेसचा दर हा 180 रुपये आहे. तर परिवर्तन बसचा दर हा 135 रुपये आहे. या फरकामुळे प्रवाशांची चांगलीच नाराजी आहे. याशिवाय परिवर्तन बसेस अडीच तासामध्ये बारामतीला पोहोचतात तर शिवशाही या बसला तीन तासाचा कालावधी लागतो. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे. यावर योग्य तोडगा काढला नाही तर, येत्या दहा दिवसात शिवशाही गाड्या अडवून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.