बारामती-फलटण रेल्वेमार्गासाठी भूसंपादन

0

रखडलेल्या प्रकल्पाला 25 वर्षांनंतर गती : काम दीड वर्षांत होणार पूर्ण

बारामती : बारामती-फलटण या रेल्वेमार्गाला तब्बल 25 वर्षानंतर गती मिळाली आहे. हा रखडलेला मार्ग येत्या दिड वर्षात पूर्ण होणार आहे. दक्षिणेकडे जाणार्‍या रेल्वेगाड्या या पुणे वगळून बारामती, फलटण, लोणंदमार्गे जातील. यासाठीची भूसंपादन प्रक्रीया बुधवारपासून सुरू झाली. या मार्गासाठी 400 एकर जमिनीची गरज असून यासाठी देण्यात येणारा मोबदला 225 कोटी रुपये आहे. यापैकी रेल्वे विभागाने 115 कोटी रुपये दिले असून केंद्र सरकारचे 110 कोटी रुपये लवकरच प्राप्त होतील. त्यामुळे हा रखडलेला प्रकल्प मार्गी लागत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

40 किमीचे अंतर कमी होणार

दोन-तीन गावांमधील 25 टक्के लोकांनी या प्रकल्पाला विरोध केला असला तरी भूसंपादन कायद्यानुसार या जमिनी खरेदी केल्या जातील. मार्च अखेरपर्यंत सर्व जमिनी ताब्यात मिळतील व लगेचच रेल्वे रुळाचे काम सुरू होईल. यामुळे उत्तर-दक्षिण हा मार्ग जवळचा होऊन 40 किमीचे अंतर कमी होणार आहे. मात्र या रेल्वेगाड्या पुण्याला न जाता बारामतीवरून जातील. साहजिकच यामुळे प्रवाशांचा तीन तासांचा वेळ वाचणार आहे तसेच वाहतूक खर्चही कमी होणार आहे. दौंड आणि पुण्याला इंजिन बदलावे लागत असल्यामुळे लागणारा वेळ यामुळे वाचणार आहे. या भूसंपादनाच्या मोबदल्यावर कोणत्याही प्रकारचा कर वजा होणार नाही, असेही निकम यांनी यावेळी सांगितले.

65 जणांना दिले खरेदीखत

बारामती तालुक्यातून तेरा गावांमधून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. बारामती तालुक्यात 37 किमीचा रेल्वेमार्ग असून फलटण तालुक्यातून 32 किमीचा मार्ग जात आहे. लाटे, माळवाडी, ढाकाळे, चोपडेवस्ती, कुरणेवाडी, सोनकसवाडी, कर्‍हावागज, बर्‍हाणपूर, कटफळ, नेपतवळण, खामगळवाडी या गावांमधून हा रेल्वेमार्ग जात आहे. मध्य रेल्वेचा हा प्रकल्प असून बुधवारपासून या गावामधील शेतकर्‍यांची रेल्वेच्या नावावर खरेदीखत करण्यास सरुवात केली आहे. त्यानुसार एक एकराकरीता बागायती क्षेत्राला 48 लाख रुपये मोबदला दिला जात आहे. या रेल्वेमार्गावर जिरायती जमीन नाही. 135 जमीन मालकांच्या जमिनी हस्तांतरीत होणार आहेत. त्यापैकी बुधवारी 65 खरेदीखत तयार करण्यात आली, अशी माहिती निकम यांनी यावेळी दिली.

बारामती तालुक्यात तीन स्थानके

न्यू बारामती जंक्शन, ढाकाळे, माळवाडी अशी तीन रेल्वेस्थानके बारामती तालुक्यात राहतील. लोणंद फलटण हा रेल्वेमार्ग तीन वर्षांपूर्वीच पूर्ण झालेला आहे. मात्र, बारामतीतील शेतकर्‍यांनी विरोध केल्यामुळे बारामती-फलटण हा रेल्वेमार्ग रखडला होता. अखेरीस बारामतीपासून बागायती पट्टा वाचविण्यासाठी हा रेल्वेमार्ग तब्बल आठ किमी लांबून नेण्यात आला आहे. या रेल्वेमार्गात कटफळला सरकारी जमीनही ताब्यात मिळाली आहे, असे निकम यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेस सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता विश्‍वास ओहाळ, तहसिलदार हनुमंराव पाटील तसेच रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.