गव्हाळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध : मुक मोर्चा
बारामती । माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी बारामतीत बंद पुकारण्यात आला होता. तसेच बहुजन सकल समाजाच्यावतीने शहरातून मुक मोर्चाही काढण्यात आला होता. अमराई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून मोर्च्याला सुरुवात झाली. महिला व तरुणी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गुणवडी चौक, इंदापूर चौक, सिनेमा रोड, सुभाष चौक येथून मार्गक्रमण करत नगरपालिकेसमोरील चौकात त्याचे जाहीर सभेत रुपांतर झाले. या हल्ल्याचा तीव्र निषेध यावेळी नोंदविण्यात आला.
आरोपींवर कारवाईची मागणी
हल्ल्यातील आरोपींना अटक केल्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. या मुक मोर्चातून आम्ही आरोपींवर कडक शिक्षा करण्याची मागणी करीत आहोत. दलित समाजातील पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यावर हल्ला होणे ही भ्याड गोष्ट आहे. याचा आम्ही निषेध नोंदवतो, असे निवेदन शासनाला देण्यात आल्याचे बहुजन सकल समाजाच्यावतीने सांगण्यात आले.
आरोपींना पकडण्यात यश
विजय गव्हाळे यांच्यावरील हल्ल्यातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. विकास बाबर (वय 27), अक्षय केमकर (वय 25), गणेश जाधव (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार सोनवणे करीत आहेत.